Join us  

जगातील 10 टक्के लोक आहेत 50 टक्के संपत्तीचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 6:23 AM

Wealth : ‘जागतिक असमानता अहवाल २०२२’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अहवालाचे सहलेखक थॉमस पिकेटी यांनी सांगितले की, जगातील १० टक्के श्रीमंतांवर अगदी अल्प प्रमाणात सांपत्तिक कर लावल्यास असमानता दूर होण्यास मदत होईल

नवी दिल्ली : जागतिक लोकसंख्येपैकी तळाच्या ५० टक्के लोकांकडे केवळ २ टक्के संपत्ती आणि ८ टक्के उत्पन्न असून १० टक्के श्रीमंतांकडे ७६ टक्के घरगुती संपत्ती आणि ५२ टक्के उत्पन्न आहे, असे २०२१ मधील संपत्तीविषयक आकडेवारीच्या अभ्यासात आढळून आले आहे. ‘जागतिक असमानता अहवाल २०२२’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अहवालाचे सहलेखक थॉमस पिकेटी यांनी सांगितले की, जगातील १० टक्के श्रीमंतांवर अगदी अल्प प्रमाणात सांपत्तिक कर लावल्यास असमानता दूर होण्यास मदत होईल. १ दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या लोकांवर १ टक्का, तर अब्जाधीशांवर ३ टक्के कर लावल्यास जागतिक उत्पन्नाच्या १.६ टक्के निधी जमा होईल. त्यातून जगाच्या आताच्या लोकसंख्येपैकी तळाच्या ५० टक्के लोकांची गरिबी दूर होईल.वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबचे सहसंचालक लुकास चॅन्सेल यांनी सांगितले की, अब्जाधीशांच्या संपत्तीत दरवर्षी ९ टक्क्यांची वाढ होत आहे. त्यांच्यावर ३.५ टक्के कर लावला तरीही त्यांची संपत्ती वाढतच राहील. या करातून ५० टक्के लोकसंख्येच्या शिक्षण आणि आरोग्याच्या समस्या सुटण्यास मदत होईल.

पन्नास टक्के जनतेचे उत्पन्न वाढले नाहीमागील काही दशकांत जागतिक उत्पन्नात प्रचंड वाढ झाली असली तरी तळाच्या ५० टक्के लोकसंख्येचे उत्पन्न वाढलेले नाही. वरच्या १० टक्के लोकांचे उत्पन्न मात्र ५० ते ६० टक्के या दरम्यान राहिले आहे. १८२० ते २०२० या २०० वर्षांच्या काळातही हीच स्थिती राहिलेली आहे. १८२० मध्ये वरच्या स्तरातील १० टक्के लोकांच्या ताब्यात ५० टक्के जागतिक उत्पन्न होते. २०२० मध्ये ते ५५ टक्के झाले. १९१० आणि २००० मध्ये ते अनुक्रमे ६० टक्के आणि ६१ टक्के होते. 

टॅग्स :व्यवसाय