Maha Kumbh Mela : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळाव्याला सुरुवात झाली आहे. कुंभचा इतिहास खूप जुना आहे. या ऐतिहासिक महाकुंभाचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. लोकांमध्ये याबाबत प्रचंड क्रेझ आहे. फक्त भारतच नाही तर जगभरातील भाविक शाही स्थानाचा आनंद घेण्यासाठी हजर झाले आहेत. यावर्षी कुंभमध्ये सुमारे ४० कोटी लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. १४४ वर्षांनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या महाकुंभात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पण या महाकुंभात स्नान करण्यावर कधीकाळी कर लावण्यात आला होता, हे तुम्हाला माहीत आहे का?
ब्रिटिश राजवटीत लावला होता कर?अनेक दशकांपूर्वी कुंभमेळा वेगळ्या स्वरूपात भरवला जायचा. ब्रिटीश राजवटीत हा उत्सव कमाईचे साधन झाला होता. राष्ट्रवाद आणि क्रांतीचाही तो आधार बनला. १९व्या शतकात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने प्रयागराजचा ताबा घेतला तेव्हा त्यांना माहिती मिळाली की दर १२ वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. मग ब्रिटिशांनी याकडे कमाईचे साधन म्हणून पाहिले. इंग्रजांना कुंभाचे धार्मिक महत्त्व अजिबात रुचले नाही, ते फक्त व्यवसाय म्हणून पाहत होते.
किती होता टॅक्स?ब्रिटिश राजवटीत कुंभाच्या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून १ रुपया घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक भक्ताला हा कर भरावा लागत होता. सध्याच्या जमान्यात १ रुपया तुम्हाला काहीच वाटत नसेल. मात्र, त्यावेळी एक रुपया ही खूप मोठी रक्कम होती. त्यावेळी भारतीयांचा सरासरी पगार १० रुपयांपेक्षा कमी होता. भारतीयांचे शोषण करण्याचा हा ब्रिटिशांचा मार्ग होता.
या पुस्तकात संपूर्ण तपशीलकुंभमेळ्यात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनही कर वसूल करण्यात आला. १८७० मध्ये ब्रिटिशांनी ३,००० लोकांना दुकाने दिली होती. इंग्रजांना त्यांच्याकडून सुमारे ४२,००० रुपये मिळाले होते. यातील एक चतुर्थांश रक्कम त्यांच्याकडून कर म्हणून घेण्यात आली. प्रत्येक दुकानदाराला ४ रुपये कर भरावा लागत होता. त्या काळात एका ब्रिटीश महिलेने भारतात सुमारे २४ वर्षे घालवली. त्या महिलेचे नाव होते फॅनी पार्क. त्यांनी त्यांच्या वंडरिंग्ज ऑफ अ पिलग्रिम इन सर्च ऑफ द पिक्चर्स या पुस्तकात स्थानिक व्यापाऱ्यांवर होणाऱ्या परिणामाबद्दल लिहिले आहे. इतिहासकार विल्यम डॅलरीम्पल यांनी २००२ मध्ये बेगम, ठग्स आणि व्हाईट मुघल्स प्रकाशित केले. कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांकडून कर वसूल करण्यात येत असल्याचे उल्लेख पुस्तकात आहे.