Join us

रुपयाला वाचवण्यासाठी १०० अब्ज डॉलर; साठ्यातील सहावा हिस्सा खर्च करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 8:29 AM

ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेलेल्या रुपयाची घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून १०० अब्ज डॉलरची योजना आखण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सध्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेलेल्या रुपयाची घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून १०० अब्ज डॉलरची योजना आखण्यात येत आहे. उपाययोजना न केल्यास रुपया आणखी घसरण्याची शक्यता लक्षात घेऊन ही योजना हाती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.मागील काही महिन्यांपासून भारतीय रुपयात विक्रमी स्वरूपात घसरण सुरू आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत अनेक पावले उचलली आहेत. तथापि, त्यांचा काहीही उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे आता रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक १०० अब्ज डॉलर खर्च करण्याच्या तयारीत आहे, असे समजते. या योजनेवर रिझर्व्ह बँकेकडून काम सुरू आहे.

बैठक पुढे ढकलली

रिझर्व्ह बँकेने व्याजदर ठरवण्यासाठी चलनविषयक धोरण समितीची बोलवण्यात आलेली बैठक पुढे ढकलली आहे. ती आता ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्यामुळे समितीचा निर्णय ४ ऑगस्टच्या ऐवजी ५ ऑगस्ट रोजी कळेल. या बैठकीतही आरबीआय व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे कर्ज महाग होणार आहे.

आणखी किती घसरणार?

- रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनी सांगितले की, घसरणारा रुपया रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक आपल्या एकूण विदेशी चलन साठ्यातील सहावा हिस्सा खर्च करण्यास तयार आहे. 

- यंदा रुपया ७.५ टक्के घसरला आहे. जाणकारांच्या मते, घसरण रोखण्यासाठी हस्तक्षेप केला गेला नाही, तर रुपया ८५ च्या पातळीच्या खाली जाण्याची शक्यता आहे. 

- रुपयातील घसरगुंडीमुळे आयटी कंपन्यांसह निर्यात उद्योगास फायदा होईल. आयात मात्र महाग होईल. त्यामुळे अंतिमत: महागाई वाढेल.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँककेंद्र सरकार