ब्रिटनमध्ये तब्बल 100 कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवस सुट्टी आणि आठवड्यातून चार दिवस कामाच्या धोरणाला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही. आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन सुट्या या मोहिमेमुळे देशात बदल घडू शकतील, अशी कंपन्यांना आशा आहे. ब्रिटनच्या या 100 कंपन्या मिळून सुमारे 2600 कर्मचाऱ्यांना रोजगार देतात. यामुळे कंपन्यांचे उत्पादन सुधारेल, असे आठवड्यातून चार दिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
द गार्डियनच्या म्हणण्यानुसार, चार दिवसांचा कामकाजाचा आठवडा कंपन्यांना उत्पादन सुधारण्यासाठी आणि कमी वेळेत समान प्रमाणात काम पूर्ण करण्यास प्रोत्साहित करेल, असा युक्तिवाद केला आहे. ज्या कंपन्यांनी नवीन धोरण लवकर स्वीकारले आहे, त्यांना कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्याचा हा एक चांगला मार्ग ठरू शकतो. ब्रिटनच्या 100 कंपन्यांपैकी दोन सर्वात मोठ्या कंपन्या एटम बँक आणि जागतिक विपणन कंपनी एविन, यांनी चार दिवस कामकाजाचा अवलंब करण्यासाठी मान्य केले आहे.
ब्रिटनमध्ये दोन्ही कंपन्यांचे 450 हून अधिक कर्मचारी काम करत असून त्यांना चार दिवस काम करण्यास मान्यता देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिटनमध्ये जून महिन्यात सहा महिन्यांच्या पायलट प्रोग्राम अंतर्गत चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्ट्यांचा फॉर्म्युला लागू करण्यात आला. यामध्ये एकूण 70 कंपन्यांनी भाग घेतला. तर हा प्रायोगिक कार्यक्रम 'फोर डे वीक ग्लोबल', 'फोर डे वीक यूके कॅम्पेन' आणि ऑटोनॉमी या विनानफा गटांनी सुरू केला होता.
प्रोजेक्टचा निकाल 2023 मध्ये जाहीर होणार आहेत. प्रायोगिक कार्यक्रमात ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठातील शैक्षणिक तसेच यूएसमधील बोस्टन कॉलेजमधील तज्ञांचा समावेश आहे. Four Day Work Week मोहिमेत 3300 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले, ज्यात बँकिंग, मार्केटिंग, रिटेल, फायनान्स आणि इतर अनेक क्षेत्रातील लोकांचा समावेश होता. याशिवाय ब्रिटनमधील अनेक कंपन्या चार दिवस कामाचा फॉर्म्युला अंमलात आणण्याचे काम करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.