Join us

बँक खात्यात अचानक आले १३ कोटी रुपये; HDFC बँकेचे १०० ग्राहक झाले मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 5:38 PM

HDFC Bank: तामीळनाडूमध्ये एचडीएफसी बँकने (HDFC) आपल्या १०० हून अधिक ग्राहकांना एक दिवसासाठी मालामाल केलं. रविवारी बँकेने त्यांच्या खात्यात प्रत्येकी १३ कोटी रुपये टाकले होते.

HDFC Bank: तामीळनाडूमध्ये एचडीएफसी बँकने (HDFC) आपल्या १०० हून अधिक ग्राहकांना एक दिवसासाठी मालामाल केलं. रविवारी बँकेने त्यांच्या खात्यात प्रत्येकी १३ कोटी रुपये टाकले होते. मात्र, काही वेळानं ग्राहकांचा आनंद मावळला. देशातील बड्या बँकेनं केलेली एक चूक आता चर्चेचा विषय बनली आहे.

चेन्नईतील टी. नगर एचडीएफसी बँकेच्या शाखेशी संबंधित १०० ग्राहकांना एक मोबाइल एसएमएस आला. मेसेजमध्ये बँकेने प्रत्येक ग्राहकाच्या खात्यात प्रत्येकी १३ कोटी रुपये जमा झाल्याचा उल्लेख केला होता. म्हणजे बँकेनं एकूण १३०० कोटी रुपयांचे डिपॉझिट विविध खात्यांवर केले होते असं म्हणता येईल. एवढी मोठी रक्कम खात्यात येताच ग्राहकांची झोपच उडाली. अनेकांना विश्वासच बसेना. काहींना तर आपले खाते हॅक होण्याची भीती वाटली आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. 

पोलिसांनी बँक शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यानंतर काही तांत्रिक बिघाडामुळे चुकीचे एसएमएस पाठवले गेल्याचं सांगण्यात आलं. बँक शाखेत सॉफ्टवेअर पॅचची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे ही समस्या उद्भवली. तथापि, संबंधित समस्या चेन्नईतील त्याच HDFC बँकेच्या शाखेतील काही खात्यांपुरती मर्यादित होती. एचडीएफसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाली होती. कोणतेही हॅकिंग झालेलं नाही आणि १०० ग्राहकांच्या खात्यात १३ कोटी रुपये जमा झालेले नाहीत. सॉफ्टवेअर त्रुटीमुळे केवळ तसा एसएमएस पाठवला केला गेला होता. संबंधित घटनेची माहिती मिळताच संबंधित खात्यातून पैसे काढण्याच्या प्रक्रियेवर बंधनं घालण्यात आली होती. पण पैसे जमा करण्याचे अधिकार सुरूच होते. जोवर असे मेसेज कसे गेले याची माहिती मिळत नाही तोवर संबंधित खात्यांमधून पैसे काढण्यावर बंधनं असणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :एचडीएफसीबँकिंग क्षेत्र