Join us  

पार्टटाईम जॉब अन् कमाईचे आमिष देणाऱ्या ‘त्या’ १०० वेबसाईट झाल्या बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 11:52 AM

गृहिणी, निवृत्तिधारकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक

नवी दिल्ली : ‘घरबसल्या कमाई करा’, ‘एका तासात कमवा २० हजार’ तसेच पार्टटाइम जॉब आदी फसव्या जाहिराती करून नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्या १००हू्न अधिक वेबसाइट केंद्रीय गृहमंत्रालयाने बंद केल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या सर्व वेबसाइट्स विदेशातून चालवल्या जात होत्या. निवृत्ती घेतलेले नागरिक, गृहिणी आणि प्रामुख्याने पार्टटाइम जॉब शोधणारे नागरिक हे चोरट्यांच्या रडारवर असत. 

गृहमंत्रालयाच्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट ॲनालिटिक्स युनिट (एनसीटीएयू) अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय सायबर क्राइम समन्वय केंद्राने मागच्या आठवड्यात या वेबसाइट बंद करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा-२००० नुसार या वेबसाइट बंद केल्या आहेत.

चोरटे कसे फसवतात?

बेकायदा गुंतवणूक योजनांमधून लोकांना फसवण्यासाठी चोरटे संघटितपणे काम करतात.  डिजिटल जाहिराती, व्हॉटस्ॲप मेसेज तसेच मेसेंजरवरून बोगस किंवा भाड्याने घेतलेल्या अकाउंटवरून संपर्क साधला जातो. कार्डद्वारे किंवा क्रिप्टो करन्सीद्वारे लोकांचे पैसे घोटाळेबाज परदेशात वळते करून घेतात. कार्यालये परदेशात असल्याने यांचा शोध घेणे आणि पैसे परत मिळवणे यंत्रणांना शक्य होत नाही, 

हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊसअनोळखी फोन नंबरवरून करण्यात आलेला संपर्क, बेकायदा गुंतवणुकीबाबत सोशल मीडियातील जाहिराती आढळताच याची माहिती देण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. यासाठी जारी केलेल्या १९३० या हेल्पलाइनवर हजारो तक्रारी करण्यात आल्या होत्या. 

जाळ्यात कसे अडकते सावज?

चोरटे मोठ्या प्रमाणावर फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डिजिटल जाहिराती करतात. यात ‘घर बैठे जॉब’ तसेच ‘घरबैठे कमाई कैसे करे’ अशा शब्दांचा वापर असतो. जाहिरातीवर क्लिक करताच एजंट व्हॉटस्ॲप किंवा टेलिग्रामवर सावजासोबत चॅटिंग सुरू करतात. सुरुवातीला व्हिडीओ लाइक करणे, नकाशा ओळखणे आदी टास्क सांगितले जातात. हे पूर्ण करताच ग्राहकांना काही बक्षीस किंवा रिवार्ड दिले जाते. यानंतर आणखी काही पैसे भरले किंवा गुंतविल्यास मोठा परतावा किंवा नोकरीचे आमिष दाखवले जाते. पैशांचा व्यवहार पूर्ण होताच चोरटे ते लंपास करतात. ही फसवणूक ग्राहकाच्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. 

कशी टाळावी फसवणूक?गुंतवणूक किंवा व्यवहार करताना सेवादात्याबाबत खातरजमा करून घ्या. अनोळखी व्यक्तीने व्हॉटस्ॲप, टेलिग्रामवर संपर्क केला असता उत्तर देणे टाळा. व्यक्ती अनोळखी असेल, यूपीआय ॲपमध्ये तिचे नाव दिसत नसेल तर पैसे पाठवू नये.  फसव्या जाहिराती आढळल्या किंवा कुणी संपर्क केल्यास सायबरसेलकडे माहिती द्या.

टॅग्स :धोकेबाजी