नवी दिल्ली: पेटीएम (Paytm) पेमेंट्स बँकेवर आरबीआयने ३१ जानेवारी रोजी बंदी घातली होती. फास्टॅग, वॉलेट आणि त्याच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने म्हटले आहे की पेटीएम बँकिंग सेवा २९ फेब्रुवारीनंतर काम करणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने या बँकेवर बंदी घातली.
पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालण्याचे मुख्य कारण म्हणजे योग्य ओळख न करता तयार केलेली करोडो खाती. या खात्यांतर्गत केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. एवढेच नाही तर ओळखपत्राविना कोट्यवधी रुपयांचे व्यवहारही केले होते, त्यामुळे मनी लाँड्रिंगची भीती निर्माण झाली होती. परंतु पेटीएम पेमेंट्स बँक आरबीआयच्या रडारवर कशी आली हे तुम्हाला माहिती आहे का?
१ पॅन कार्डवर १००० बँक खाती
रॉयटर्सच्या अहवालानुसार, आरबीआयने बंदी लादण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अंतर्गत १००० हून अधिक वापरकर्त्यांची खाती एका पॅनशी जोडलेली होती. शिवाय, RBI आणि ऑडिटर्स या दोघांनी केलेल्या तपासणीत पेटीएम बँक नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले.
पेमेंट्स बँकेत ३१ कोटी निष्क्रिय खाती-
पेटीएम पेमेंट्स बँकेकडे सुमारे ३५ कोटी ई-वॉलेट आहेत. त्यापैकी सुमारे ३१ कोटी सक्रिय नाहीत, तर केवळ ४ कोटी रक्कम नसताना किंवा फारच कमी रकमेसह चालू आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात निष्क्रिय खाती आहेत. तर लाखो खात्यांमध्ये केवायसी अपडेट केलेले नाही.
२ अब्ज डॉलर्सचे नुकसान
आरबीआयच्या निर्देशानंतर पेटीएम ब्रँडची मालकी असलेल्या One97 Communications Limited चे शेअर्स गेल्या दोन दिवसात ४० टक्क्यांनी घसरले आहेत. शुक्रवारी बीएसईवर शेअर २० टक्क्यांनी घसरून ४८७.०५ रुपयांवर आला. दोन दिवसांत कंपनीचे मार्केट कॅप १७,३७८.४१ कोटी रुपयांनी घसरून ३०,९३१.५९ कोटी रुपयांवर आले आहे.