Polycab share today: गुरुवारी शेअर बाजराच्या सुरूवातीच्या टप्प्यात सेन्सेक्समध्ये वाढ दिसून आली होती. परंतु या तेजीदरम्यान, गुरुवारी पॉलीकॅब इंडियाच्या शेअर्समध्ये सुमारे २० टक्क्यांची घसरण दिसून आली आणि ते कामकाजादरम्यान ३८६५ रुपयांच्या स्तरावर ट्रेड होत होते. सुमारे ५९९३० कोटी रुपयांचं मार्केट कॅप असलेल्या पॉलीकॅब इंडिया लिमिटेडच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ५७३३ रुपये आहे तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २६५१ रुपये आहे. पॉलीकॅब इंडिया लिमिटेडच्या कार्यालयावर आयकर विभागाने नुकताच छापा टाकला ज्यामध्ये १००० कोटी रुपयांच्या विक्रीची कागदपत्रंच सापडली नाहीत.
गुरुवारी कामकाजाच्या सुरूवातीच्या कालावधीत पॉलिकॅब इंडियाचे शेअर्स ३९३० च्या पातळीवर गेले होते. दरम्यान, पॉलिकॅब समूहाच्या कार्यालयावर पडलेल्या छाप्यांमध्ये पॉलिकॅब इंडियानं १००० कोटी रुपयांच्या प्रोडक्ट्सच्या विक्री संबंधित दस्तऐवज उपलब्ध करुन दिलेलं नाही. पॉलिकॅब इंडियाच्या कार्यालयात ४ कोटी रुपयांची अनअकाऊंटेड रक्कम सापडली आहे. यासोबतच २५ बँक लॉकर्स निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचं सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सनं एका निवेदनाद्वारे सांगितलं.
५० कार्यालयांमध्ये छापे
मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकसोबतच गुजरात आणि दिल्लीतही पॉलिकॅब इंडियाच्या ५० कार्यालयांवर एकत्र छापे टाकण्यात आले होते. डिजिटल डेटा आणि डॉक्युमेंट्सच्या रुपात असे अनेक पुरावे मिळालेत आहेत, ज्यावरुन पॉलिकॅब इंडिया योग्य रित्या टॅक्स जमा करत नसल्याचं यातून समजून येत असल्याचं सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सनं म्हटलंय.
पॉलिकॅब इंडियाच्या शेअर्समध्ये गेल्या ५ दिवसांत २६ टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली आणि शेअर्स १४०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ३० टक्क्यांपर्यंत नुकसान दिसून आलंय.