मुंबई, दि. 28 - गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बाजारात दाखल झालेल्या 200 रुपयाच्या नोटेनंतर आता 1000 रुपयाची नवी नोट पुन्हा बाजारात येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. यानंतर 500 ची नवी नोट बाजारात आणण्यात आली होती. मात्र 1000 च्या नोटेऐवजी 2000 रुपयांची नवी नोट चलनात आली होती. पण 500 आणि 2000 च्या मध्ये कोणतंच चलन नसण्याने लोकांना अनेकदा समस्येला सामोरं जावं लागत आहे. यामुळे गॅप भरुन काढण्याच्या उद्धेशाने 1000 ची नवी नोट चलनात आणली जात असल्याचं सांगितलं जात आहे.
डीएनएने यासंबंधी वृत्त दिलं असून सरकार लवकरच नव्या 1000 रुपयांच्या नोटांची छपाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नव्या नोटेमध्ये अतिरिक्त सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. नव्या एक हजाराच्या नोटेची रचना आणि छपाईसाठी लागणा-या कागदाची तयारी झाली आहे. येत्या डिसेंबरपर्यंत ही नोट बाजारात येऊ शकते, असं अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे. कर्नाटकातील म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधील सलबोनी इथे या नोटांची छपाई करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. यानंतर 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. नव्या चलनात 500 आणि 1000 च्या मध्ये कोणतीच नोट नसल्याने अनेकदा सुट्ट्यांचे वांदे होतात. हा गॅप भरुन काढण्यासाठी 1000 ची नोट फायद्याची ठरेल असं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. नोटाबंदीनंतर सरकारने 500 आणि 2000 ची नवी नोट आणली होती. तसंच 50 रुपयाच्या नव्या नोटेची घोषणा करण्यात आली असून 200 ची नवी नोटही चलनात आली आहे. त्यानंतर आता 1000 ची नोट येत आहे.
छोट्या नोटांमुळे छोटे व्यवहार सुरळीत करणं मुख्य उद्देश आहे. 200 ची नवी नोट एटीएममध्ये उपलब्ध नाही, तर ती बँकेतच मिळणार आहे.