Join us

देशात उघडणार १० हजार नवी पोस्ट ऑफिसेस, घरपोच सेवा देण्याच्या तयारीत सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 9:02 PM

पोस्ट ऑफिसच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने विभागाला दिला ५,२०० कोटी रुपयांचा निधी.

भारतीय पोस्ट विभाग आपला आवाका वाढवण्यासाठी या वर्षी आणखी १० हजार टपाल कार्यालये उघडणार आहे. आम्हाला आमची पोहोच वाढवण्यासाठी आणखी टपाल कार्यालये उघडण्याची आवश्यकता आहे. आम्हाला आणखी १० हजार टपाल कार्यालये सुरू करण्याची परवानगी मिळाली असल्याची माहिती पोस्ट विभागाचे सचिव अमन शर्मा यांनी दिली.

लोकांना त्यांच्या राहत्या घरापासून पाच किलोमीटरच्या आत बँकिंग आणि वित्तीय सेवा मिळाव्यात अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही आणखी टपाल कार्यालये सुरू करत आहोत, असेही शर्मा यांनी सांगितले. ही नवी टपाल कार्यालये चालू आर्थिक वर्षात म्हणजेच मार्च २०२३ पर्यंत उघडली जातील. यानंतर भारतातील एकूण टपाल कार्यालयांची संख्या सुमारे १.७ लाख होईल. याशिवाय सरकारी सेवा देण्यासाठी प्रोजेक्ट आणि तंत्रज्ञानावरही विभाग काम करत आहे. अमन शर्मा यांनी माहिती दिली की तंत्रज्ञानाचा वापर करून टपाल कार्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने विभागाला ५,२०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

“आम्ही नुकतीच गुजरातमध्ये ड्रोनद्वारे डिलिव्हरी केली आहे. सरकारने आम्हाला २०१२ मध्ये सुरू केलेला आयटी प्रकल्प पुढे नेण्यास सांगितले आहे. टपाल आणि विविध सरकारी सेवा लवकरच घरोघरी पोहोचवल्या जातील. टपाल कार्यालयांमध्ये येण्याऐवजी तंत्रज्ञानाच्या मदतीने सेवा लोकांच्या घरापर्यंत पोहोचवल्या जातील,” असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :पोस्ट ऑफिसभारत