कानपूर: देशभरात नोटबंदी करुन अडीच वर्ष होऊन गेल्यानंतरही बाजारात बनावट नोटा थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यातच कानपूरमध्ये गेल्या 15 दिवसांत एक कोटी किंमतीच्या दोनशे रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याचा प्रकार उघडकीस आल्या असून आणखी मोठ्या प्रमाणात अशा बनावट नोटा बाजारपेठेत असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, अनेक नागरिकांकडे खोट्या नोटा आढळून येत आहे, मात्र, भीतीपोटी उघडपणे बोलत नसल्याचे समजते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरमधील सर्वोदय नगरमध्ये साधे पानपटीचे दुकान चालवणाऱ्या दुकानदाराला गेल्या सहा दिवसांत तीनवेळा दोनशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या बनावट नोटांपैकी एक नोट सध्या त्याच्याकडे असल्याचेही या दुकानदाराने सांगितले. पण, स्थानिक पोलिसांनी यासंबंधीत आतापर्यंत कोणतीच तक्रार आली नसल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, याप्रकरणी तथ्य आढळल्यास किंवा बनावट नोटा बाजारात आणणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी योग्य पाऊले उचलली जातील, असे येथील अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रेम प्रकाश यांनी सांगितले.
दोनशे रुपयांची खरी नोट ओळखण्याचे हे आहेत 11 प्रकार:
1. नोटच्या पुढील बाजूस असलेल्या 200 रुपयांचे चिन्ह आहे. ते चिन्ह जेव्हा नोटला उजेळाच्या दिशेने कराल तेव्हा दिसून येईल. तसेच नोटांवर महात्मा गांधी चित्र देखील दिसेल.
2. समोरच्या बाजूला देवनागरी लिपीमध्ये दोनशे असे लिहले आहे, त्याचप्रमाणे नोटच्या मागच्या बाजूला देखील देवनागरीत दोनशे असे लिहले आहे.
3. नोटवर महात्मा गांधी यांचे चित्र व दोनशे रुपयांचे वॉटरमार्कच्या स्वरुपात देखील आहे.
4. नोटवर हिरवा रंगाची सुरक्षा धागा असून त्यावर भारत आणि आरबीआई लिहले आहे. तसेच नोट क्रॅास करुन बघितल्यास हाच हिरवा धागा निळ्या रंगात दिसेल.
5. नोटेचा खरेपणा सिद्ध व्हावा यासाठी गव्हर्नरांची स्वाक्षरी छापताना ती सहज स्पर्शून जाईल अशी उन्नत छापलेली असते.
6. नोटवर 200 रुपये हिरव्या रंगात असून नोट क्रॅास केल्याने तेच निळ्या रंगात दिसेल.
7.नोटीच्या डावीकडे उन्नत स्वरूपात अशोकस्तंभही छापलेला असतो.
8. नोट कधी छापण्यात आली यासाठी नोटवर छापण्यात आलेले वर्ष देखील असते. तसेच छापील वर्षाच्या खालच्या बाजूला हिंदीत दो सौ असे लिहिले आहे.
9. नोटच्या डाव्या व मागील बाजूकडे स्वच्छ भारत अभियानचे चिन्ह असलेले महात्मा गांधींचा चश्मा असून त्यामध्ये स्वच्छ भारत लिहिले आहे. तसेच खालच्या बाजूला एक कदम स्वच्छता की ओर असे वाक्य लिहण्यात आले आहे.
10. नोटच्या मागील बाजूवर 15 विविध भाषेत दोनशे असे लिहिले असून यामध्ये हिंदी भाषेचा समावेश नाही. नोटवर पुढच्या व मागच्या बाजूला हिंदी भाषेत दो सौ असे लिहिले असल्याने नोटवर एकूण 16 भाषेंचा समावेश आहे.
11. दोनशे रुपयांच्या नोटच्या मागे सांची स्तूपची आकृती दिसून येईल.