Join us  

मुंबईत ११ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; १ कोटींहून अधिक किंमतीच्या घरांची जबरदस्त विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 3:41 PM

मुंबईत यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत झालेल्या विक्रीत १ कोटींहून अधिक किंमत असलेल्या घरांची जास्त विक्री झाली आहे

मुंबई – रिअल इस्टेटच्या दृष्टीने पाहिले तर मुंबई देशातील सर्वात महागडं शहर आहे. कोरोनानंतर देशात घर बांधकामाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे घरही महाग झाले आहेत. परंतु मुंबईत त्याचा कुठलाही परिणाम दिसत नाही. मागील महिन्याची आकडेवारी पाहिली तर शहरात १० हजाराहून अधिक घरांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. गेल्या ११ वर्षातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे. ट्रेंड पाहिला तर १ कोटीहून अधिक किंमतीची घरे जास्त प्रमाणात विकली गेली आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या निबंधक कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात मुंबईत एकूण १० हजार ६०१ घरांची नोंदणी झाली. या नोंदणीतून सरकारच्या तिजोरीत ८३५.३२ कोटी रुपये महसूल जमा झाला. मागील ११ वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यातील नोंदणी सर्वाधिक आहे. या नोंदणीत ८० टक्के प्रॉपर्टी रहिवासी आणि २० टक्के मालमत्ता व्यावसायिक वापरासाठी नोंद झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, मागील महिन्यात नवरात्र आणि दसरा होता. त्याआधी गणेशोत्सवही होता. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये व्यवहार करण्याला सर्वसामान्य पसंती देतात. आता धनोत्रयोदशी आणि दिवाळी येत आहे. त्याकाळातही घरांची विक्री होऊ शकते.

मुंबईत यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत झालेल्या विक्रीत १ कोटींहून अधिक किंमत असलेल्या घरांची जास्त विक्री झाली आहे. जवळपास निम्म्याहून अधिक विक्री झालेल्या घरांची किंमत १ कोटीहून जास्त आहे. या कालावधीत १ लाख ४ हजार ८३२ नोंदणी झाली. त्यातील ५८ हजार ७०६ मालमत्तेची किंमत १ कोटीहून जास्त आहे. तर ४६ हजार १२६ नोंदणीकृत घरांच्या किंमती १ कोटीहून कमी आहेत. एका रिपोर्टनुसार, उच्च मागणी असणाऱ्या पूर्व व पश्चिम उपनगरात अनेक नवीन प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आले आहेत. त्याठिकाणी मेट्रो नेटवर्क आणि अनेक सुविधा आहेत. त्यामुळे इथल्या किंमती वाढल्या आहेत. पश्चिम उपनगरात जवळपास ७४ टक्के तर मध्य उपनगरात ८१ टक्के खरेदी झाली आहे.

मुंबईतील हाऊसिंग मार्केट मजबूत आहे. मागील महिन्यात याठिकाणी १० हजाराहून अधिक नोंदणी झाली आहे. त्याआधीही मालमत्तेचा आकडा १० हजारांच्या आसपास आहे. सध्या लोकांची पसंती घर खरेदी करण्याकडे आहे. त्यात १ कोटीहून अधिक किंमती असलेल्या घरांकडे लोकांचा कल आहे. लोकांचा कल पाहता रिअल इस्टेटमधील दरही वाढले आहेत. लॉन्गटर्म गुंतवणुकीसाठी लोकं इच्छुक आणि सक्षम आहेत.

टॅग्स :बांधकाम उद्योग