बँक ऑफ इंडियाला आयकर विभागाच्या असेसमेंट युनिटकडून १,१२८ कोटी रुपयांची डिमांड नोटीस मिळाल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण २०१६-१७ च्या मूल्यांकन वर्षाशी संबंधित आहे. बँक ऑफ इंडियानं स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे. ३० मार्च रोजी बँकेला आयकर विभागाच्या असेसमेंट युनिटकडून डिमांड नोटीस मिळाली आहे. ही डिमांड नोटीस २०१६-१७ च्या असेसमेंट इयरशी संबंधित असल्याचं यात म्हटलंय.
३० मार्च २०२४ रोजी मिळालेली डिमांड नोटीस आयकर कायदा १९६१ च्या कलम १५६ च्या उल्लंघनाशी संबंधित असल्याचं बँकेनं म्हटलंय. या डिमांड नोटीसचा बँकेच्या आर्थिक, परिचालन आणि इतर कामकाजावर परिणाम होणार नाही. बँक या नोटीसविरुद्ध आयकर आयुक्त (अपील), नॅशनल फेसलेस अपील सेंटर (NFAC) यांच्याकडे अपील करण्याची तयारी करत असल्याचंही बँकेनं स्पष्ट केलंय.
बँकेचं असंही म्हणणं आहे की अपीलीय अधिकाऱ्यांचे पूर्वीचे निर्णय लक्षात घेऊन, कायदेशीर आणि तार्किक पद्धतीनं आपली बाजू मांडण्यासाठी पुरेशा गोष्टी उपलब्ध आहेत. त्यामुळे यावर सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, सोमवारी कामकाजाच्या सुरुवातीला बँकेचे शेअर्स २.४४ टक्क्यांनी वधारून १४०.४० रुपयांवर व्यवहार करत होते.