Join us

गुड न्यूज! डिसेंबरमध्ये १.१५ लाख कोटी जीएसटी जमा; आतापर्यंतचा उच्चांक

By देवेश फडके | Published: January 01, 2021 5:18 PM

डिसेंबर महिन्यातील वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) जमा रक्कम १.१५ लाख कोटीच्या घरात पोहोचली आहे. जीएसटी संकनलाच्या इतिहासात हा सर्वोच्च आकडा मानला जात आहे. 

ठळक मुद्देडिसेंबरमधील जीएसटी संकलन १.१५ लाख कोटींवरआतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी संकलनभारतीय अर्थव्यवस्थेसाठी वर्षारंभी सकारात्मक बाब

नवी दिल्ली : सन २०२० ने जाता जाता देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सुखद धक्का दिला असून, डिसेंबर महिन्यातील वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) जमा रक्कम १.१५ लाख कोटीच्या घरात पोहोचली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारने देशवासीयांना ही गुड न्यूज दिली आहे. 

कोरोना संकटामुळे सुरुवातीला संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, यानंतर देश हळूहळू अनलॉक होऊ लागला. देशातील अनलॉकनंतर अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने रुळावर येत असल्याचे संकेत जीएसटीच्या जमा रकमेतून मिळत आहेत, असे म्हटले जात आहे. डिसेंबर महिन्यात जीएसटीची एकूण जमा रक्कम एक लाख १५ हजार १७४ कोटी रुपये असून, जीएसटी संकनलाच्या इतिहासात हा सर्वोच्च आकडा मानला जात आहे. 

प्रथम १.१५ लाख कोटींच्या पार

प्रथम जीएसटी संकलन १.१५ लाख कोटी रुपयांवर गेले असून, यापूर्वी एप्रिल २०१९ मध्ये १ लाख १३ हजार ८६६ कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता. यामध्ये केंद्र सरकारच्या जीएसटी म्हणजेच CGST ची रक्कम २१ हजार ३६५ कोटी रुपये तर राज्यांच्या जीएसटी म्हणजेच SGST ची रक्कम २७ हजार ८०४ कोटी रुपये आहे. याचप्रमाणे एकूण इंटीग्रेटेड जीएसटी म्हणजेच IGST ची रक्कम ५७ हजार ४२६ कोटी रुपये आहे. यातील ८ हजार ५७९ कोटी रुपये सेस वसूल करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात एकूण ८७ लाख GSTR-3B रिटर्न दाखल करण्यात आले.

केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहिनुसार, रेग्युलर सेटलमेंट अंतर्गत 'आयजीएसटी'तील २३ हजार २७६ कोटी रुपये 'सीजीएसटी' आणि १७ हजार ६८१ कोटी रुपये 'एसजीएसटी'चे देण्यात आले आहेत. याप्रमाणे डिसेंबर महिन्यातील केंद्र आणि राज्य सरकारचा जीएसटी अनुक्रमे ४४ हजार ६४१ कोटी रुपये आणि ४५ हजार ४८५ कोटी रुपये आहे. 

जीएसटी संकलनात १२ टक्के वाढ   

डिसेंबर २०१९ च्या तुलनेत डिसेंबर २०२० मधील जीएसटी संकलनात १२ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. यामध्ये आयात 'जीएसटी'त २७ टक्के तर देशांतर्गत व्यवहारातील 'जीएसटी'त ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोना संकटातही ऑक्टोबर २०१९ मध्ये जीएसटी संकलन १ लाख ०५ हजार १५५ कोटी रुपये आणि नोव्हेंबर २०१९ मध्ये 'जीएसटी'चे संकलन १ लाख ०४ हजार ९६३ कोटी रुपये झाले होते. तर, डिसेंबर महिन्यात 'जीएसटी'चे विक्रमी संकलन झाले.

 

टॅग्स :जीएसटीअर्थव्यवस्थाव्यवसाय