Join us

गगन भरारी! २ वर्षांत येणार १२०० विमाने; Air India नंतर अन्य कंपन्याही खरेदीच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 5:41 AM

केवळ ३०० नव्हे तर इंडिगो कंपनीतर्फे नव्या ५०० विमानांची खरेदी होऊ शकते, अशी चर्चा विमान उद्योगात आहे.

मुंबई : एअर इंडिया कंपनीने आपल्या ताफ्यात नवीन ४७० विमाने खरेदी करत दाखल करण्याची घोषणा केल्यानंतर आता देशात कार्यरत अन्य विमान कंपन्यांनीही नव्या विमानांच्या खरेदीची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. या कंपन्यांच्या नियोजनानुसार जर ही विमान खरेदी झाली तर आगामी दोन वर्षांत देशातील विमान कंपन्यांच्या ताफ्यात नवीन १२०० विमाने दाखल होतील. 

विमान क्षेत्राशी निगडित ‘सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशन इंडिया’ (सीएपीए) या अग्रगण्य संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालाद्वारे भारतातील विमान कंपन्यांच्या नव्या विमान खरेदीविषयी टिपणी करण्यात आली आहे. एअर इंडियाने नव्या ४७० विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली असून, यापैकी २२० विमाने एअर इंडिया कंपनी बोईंग कंपनीकडून खरेदी करणार आहे तर २५० विमाने ही एअरबस कंपनीकडून खरेदी करण्यात येणार असल्याचे समजते.

याखेरीज इंडिगो विमान कंपनीनेही नव्या विमानांच्या खरेदीची चाचपणी केल्याचे वृत्त आहे. कोरोना महामारीपूर्वी कंपनीने ३०० नव्या विमानांच्या खरेदीचा विचार सुरू केला होता. मात्र, महामारीच्या संकटामुळे हा विचार त्यावेळी स्थगित करण्यात आला होता. मात्र, आता महामारीचे संकट आटोक्यात आल्यानंतर कंपनी पुन्हा एकदा नव्या विमानांच्या खरेदीचा विचार करत असल्याचे समजते. तसेच, केवळ ३०० नव्हे तर इंडिगो कंपनीतर्फे नव्या ५०० विमानांची खरेदी होऊ शकते, अशी चर्चा विमान उद्योगात आहे. विमानांच्या निर्मितीमध्ये जगात अग्रेसर असलेल्या बोईंग आणि एअरबस या दोन्ही कंपन्यांतर्फे १२ हजार ६६९ विमानांची निर्मिती रखडल्याचे वृत्त आहे. विमानाच्या इंजिनसाठी आवश्यक सुट्या भागांची चणचण असल्यामुळे विमानांची निर्मिती रखडल्याचे समजते. 

टॅग्स :एअर इंडियाइंडिगो