नवी दिल्ली : मुद्रा योजनेतहत सरकार चालू वित्त वर्षाच्या अखेरपर्यंत सूक्ष्म व छोट्या व्यावसायिकांना १.२२ लाख कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.मुद्रा योजनेतहत् कर्ज वाटपाच्या मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, आतापर्यंत या योजनेखाली ३७ लाख छोट्या व्यावसायिकांना २४ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. मुद्रा योजनेनुसार व्यावसायिक क्षेत्राला कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यांना आतापर्यंत असे कर्ज मिळालेले नाही, त्यांना कर्ज देण्यावर भर आहे. या व्यावसायिकांनी नवीन रोजगार निर्माण करण्याचा त्यामागे हेतू आहे.ते म्हणाले की, या छोट्या व्यावसायिकांना कर्ज घेताना कोणत्याही प्रकारची हमी द्यावी लागणार नाही. आम्ही त्यांनाही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. या योजनेतहत् तीन श्रेणीत कर्ज दिले जाणार आहे.त्यात शिशु श्रेणीत ५० हजार रुपयांपर्यंत, किशोर श्रेणीत ५० हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत आणि तरुण श्रेणीत पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे.दरम्यान, जागतिक बँकेच्या प्रबंध संचालक मूल्याणी इंद्राणी यांच्याशी जेटली यांनी चर्चा केली. उगवत्या अर्थव्यवस्थांना मदत म्हणून जागतिक बँकेत सुधारणा करण्यावर त्यांनी यावेळी भर दिला.
मुद्रा योजनेनुसार १.२२ लाख कोटींचे कर्ज देणार
By admin | Published: September 25, 2015 9:58 PM