मुंबई : किरकोळ विक्री क्षेत्रातील प्रसिद्ध ब्रँड ‘डी-मार्ट’चे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी अलीकडेच मुंबईत सर्वांत मोठा रिअल इस्टेट सौदा केला असल्याची माहिती समोर आली आहे. राधाकिशन दमानी, त्यांचे कुटुंबीय आणि सहयोगी कंपन्यांनी मुंबईत १,२३८ कोटी रुपयांच्या २८ गृहसंकुलांची खरेदी केली आहे.
‘झपके डॉट काॅम’ या वेबसाईटने नोंदणी दस्तावेजांच्या हवाल्याने हे वृत्त दिले. दमानी यांच्या वतीने मुंबईतील वरळी भागातील ॲनी बेझंट रोडवरील थ्री सिक्स्टी वेस्टच्या टॉवर बी मध्ये अपार्टमेंट खरेदी करण्यात आले आहे. २०२३ च्या अर्थसंकल्पात घरांसह सर्व दीर्घकालीन मालमत्तांच्या विक्रीवरील भांडवली लाभाच्या फेरगुंतवणुकीस दहा कोटी रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे. ही तरतूद लागू हाेण्यापूर्वीच हा व्यवहार झाला आहे.
१.८२ लाख चाैरस फूट क्षेत्राफळ
प्राप्त माहितीनुसार, राधाकिशन दमानी, त्यांचे कुटुंबीय आणि सहयोगी कंपन्या यांनी खरेदी केलेल्या या मालमत्तांचे क्षेत्रफळ १,८२,०८४ चौरस फूट आहे. त्यात १०१ कार पार्किंगच्या जागांचा समावेश आहे. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी या सौद्याची अधिकृत नोंदणी झाली आहे.