लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २००८ मध्ये ‘इमामी समूहा’कडून अवघ्या १२.५ कोटी रुपयांत खरेदी केलेली ‘झेडसीएल केमिकल्स’ ही कंपनी पारीख परिवाराने आता तब्बल २ हजार कोटी रुपयांत विकली आहे.
खाजगी संस्था ॲडव्हंट इंटरनॅशनलने ही कंपनी विकत घेतली आहे. या सौद्यामुळे मॉर्गन स्टॅन्ले प्रायव्हेट इक्विटी एशियाचीही झेडसीएलमधून एक्झिट होणार आहे. सक्रिय औषधी घटक (एपीआय) व्यवसायात असलेली ‘झेडसीएल केमिकल्स लि.’ ही कंपनी पूर्वी ‘झंडू केमिकल्स लि.’ या नावाने ओळखली जात होती. कंपनीत ‘मॉर्गन स्टॅन्ले प्रायव्हेट इक्विटी’ची १९ टक्के हिस्सेदारी असून ८१ टक्के हिस्सेदारी झंडू फार्मास्युटिकल वर्क्सचे माजी प्रवर्तक असलेल्या पारीख परिवाराच्या ताब्यात आहे. झेडसीएल केमिकल्स ही कंपनी पूर्वी झंडू फार्मास्युटिकल्सची उपकंपनी होती. झंडू फार्मास्युटीकल्समध्ये पारीख परिवार सहसंस्थापक होता.
पारीख परिवार आणि कोलकतास्थित इमामी समूह यांच्यात कंपनीच्या विक्रीवरून २००८ मध्ये मोठा संघर्ष झडला होता. सहसंस्थापक समूहाने हिस्सेदारी इमामी समूहास विकली त्यामुळे परिवारासही ४० टक्के हिस्सेदारी ४०० कोटींना इमामी समूहाला विकावी लागली होती. झेडसीएल केमिकल्स ही कंपनी इमामीकडून १२.५ कोटी रुपयांना पुन्हा खरेदी केली होती.
७४ टक्के हिश्शाचे तत्काळ अधिग्रहणझेडसीएलमधील ७४ टक्के हिस्सेदारी ॲडव्हंट इंटरनॅशनलकडून तात्काळ अधिग्रहित करण्यात येईल. उरलेली २६ टक्के हिस्सेदारी नियामकीय मंजुरीनंतर अधिग्रहित केली जाणार आहे. या व्यवहारास थेट परकीय गुंतवणूक बोर्ड व औषध निर्माण विभागाची मंजुरी लागणार आहे. त्यासाठी सहा महिने लागतील. झेडसीएल केमिकल्सचे प्रवर्तक व मुख्य भागधारक निहार पारीख यांनी सांगितले की, मॉर्गन स्टॅन्लेला कंपनीतून बाहेर पडायचे होते. त्यामुळे आम्ही त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू केली होती. तथापि, गुंतवणूकदारांकडून इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की, संपूर्ण कंपनीच विकण्यासाठी ही योग्य वेळ आहे, असे वाटले.