Join us  

गेल्या दहा वर्षात 12.5 कोटी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या; SBI च्या रिपोर्टमधून खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 4:14 PM

भारतात 2004 ते 2014 च्या तुलनेत, 2014 ते 2023 दरम्यान 4.3 पट जास्त रोजगार निर्माण झाले.

SBI Report : देशात 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यानंतर देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. पण, आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) रिपोर्टमधून वेगळीच माहिती समोर आली आहे. 2014 ते 2023 दरम्यान भारतात तब्बल 12.5 कोटी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. तर, 2004 ते 2014 दरम्यान हा आकडा 2.9 कोटी होता. म्हणजेच, काँग्रेसच्या काळापेक्षा भाजपच्या काळात 4.3 पट जास्त रोजगार निर्माण झाले. 

कृषी संबंधित रोजगार वगळले, तर आर्थिक वर्ष 2014 आणि आर्थिक वर्ष 2023 दरम्यान उत्पादन आणि सेवा क्षेत्रात 8.9 कोटी रोजगार निर्माण झाले. तर, आर्थिक वर्ष 2004 ते आर्थिक वर्ष 2014 दरम्यान 6.6 कोटी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. एमएसएमई मंत्रालयाकडे नोंदणीकृत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील रोजगाराचा आकडा 20 कोटींच्या पुढे गेला आहे.

एमएसएमई मंत्रालयाच्या एंटरप्राइझ पोर्टलवर 4 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, 4.68 कोटी नोंदणीकृत एमएसएमईमध्ये 20.20 कोटी लोकांना रोजगार मिळत आहे. यापैकी 2.3 कोटी नोकऱ्या जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) मधून मुक्त झालेल्या अनौपचारिक सूक्ष्म युनिट्समधील आहेत. गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत एमएसएमईमधील नोकऱ्यांमध्ये 66 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

SBI चे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष म्हणाले की, EPFO ​​आणि RBI च्या KLEMS (कॅपिटल, लेबर, एनर्जी, मटेरियल आणि सर्व्हिसेस) डेटाची तुलना केल्यावर खूप चांगला ट्रेंड दिसून आला आहे. 

कमी उत्पन्न असलेलेल्या नोकऱ्यांचा डेटा संकलित करणाऱ्या EPFO च्या ​​डेटानुसार, FY24 मध्ये नोकऱ्यांमधील हिस्सा 28 टक्क्यांवर घसरला आहे, जो गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत (FY19 ते FY23) सरासरी 51 टक्के होता. यावरुन असे दिसून येते की, आता लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळत आहेत. सरकारच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे बांधकाम क्षेत्रात रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.

 

टॅग्स :नोकरीकर्मचारीनरेंद्र मोदीराहुल गांधीकाँग्रेसभाजपा