Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकांचे १.३ लाख कोटींचे व्यवहार संपामुळे विस्कळीत

बँकांचे १.३ लाख कोटींचे व्यवहार संपामुळे विस्कळीत

बँकांचे कर्मचारी व अधिकारी यांनी मंगळवारी पुकारलेला देशव्यापी संप यशस्वी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला

By admin | Published: March 1, 2017 04:12 AM2017-03-01T04:12:42+5:302017-03-01T04:12:42+5:30

बँकांचे कर्मचारी व अधिकारी यांनी मंगळवारी पुकारलेला देशव्यापी संप यशस्वी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला

1.3 lakh crores of rupees were disrupted due to strike | बँकांचे १.३ लाख कोटींचे व्यवहार संपामुळे विस्कळीत

बँकांचे १.३ लाख कोटींचे व्यवहार संपामुळे विस्कळीत


नवी दिल्ली : सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या यासाठी बँकांचे कर्मचारी व अधिकारी यांनी मंगळवारी पुकारलेला देशव्यापी संप यशस्वी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला. तर, या संपामुळे बँकिंग क्षेत्रातील सुमारे १.३ लाख कोटी रुपयांचे व्यवहार विस्कळीत झाले, असा अंदाज ‘असोचेम’ या व्यापार-उद्योगाच्या शीर्षस्थ संस्थेने व्यक्त केला. या संपामुळे परकीय चलन वटणावळीच्या व चेक आणि अन्य कागदी विनिमयाच्या ‘क्लीअरिंग’च्या १.३ लाख कोटी रुपयांच्या व्यवहारांत अडथळे आले असावेत. तसेच दिवसअखेरच्या लेन-देनीनंतर बँकांच्या खाती जमा होणारे ‘ग्रॉस क्रेडिट’चे १,६०० कोटी जमा होऊ शकले नसावेत, असे ‘असोचेम’चे महासचिव डी. एस. रावत यांनी सांगितले.
बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सात अखिल भारतीय संघटनांनी मिळून स्थापन केलेल्या ‘युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स’ने संपाची ही हाक दिली होती. त्यानुसार व्यापारी बँकांच्या ८५ हजार व सहकारी आणि अन्य बँकांच्या एक लाखाहून अधिक शाखांमध्ये संप यशस्वी झाल्याचा दावा संघटनांच्या नेत्यांनी केला.
स्टेट बँकेसह अन्य सरकारी बँका, काही जुन्या खासगी बँका, विदेशी बँका, सहकारी बँका आणि ग्रामीण बँकांमध्ये हा संप प्रामुख्याने झाला. मात्र आयसीआयसीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस यासह इतर मोठ्या खासगी बँकांचे, चेक क्लीअरिंग वगळता अन्य व्यवहार सुरळीत सुरू राहिले. जेथे संप झाला तेथेही शाखा उघड्या होत्या. पण कर्मचारी नसल्याने ग्राहकांनी प्रत्यक्ष बँकेत येऊन करण्याचे व्यवहार होऊ शकले नाहीत. तसेच बँकांच्या नेटबँकिंग सेवा व एटीएमही सुरू राहिल्याने यांचा वापर करणाऱ्यांची फारशी अडचण झाली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
काय होत्या मागण्या?
सरकारने कामगारविरोधी धोरणे मागे घ्यावीत, नोटाबंदीच्या काळात कर्मचाऱ्यांनी केलेल्या अतोनात मेहनतीचा त्यांना योग्य मोबदला दिला जावा, बँकांच्या बुडीत कर्जांसाठी वरिष्ठ व्यवस्थापनावर बडगा उगारावा आणि नव्या वेतन कराराच्या वाटाघाटी लवकर सुरू कराव्यात या व अन्य मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.
नॅशनल आॅर्गनायजेशन आॅफ बँक वर्कर्स व नॅशनल आॅर्गनायजेशन आॅफ बँक आॅफिसर्स या भारतीय मजदूर संघाशी संलग्न दोन संघटना मात्र सहभागी नव्हत्या.देशभरात बँक संघटनांनी अशा प्रकारे आपल्या मागण्यांसाठी निदर्शने केली.

Web Title: 1.3 lakh crores of rupees were disrupted due to strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.