नवी दिल्ली - जोकर्स स्टॅश नावाच्या वेबसाईटवर भारतातील 13 लाख क्रेडिट, डेबिड कार्डची माहिती विक्रीला काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सिंगापूरच्या तपास संस्थेने उघडकीस आणला आहे. एका कार्डासाठी 7 हजार किंमत लावण्यात आली असून, ही माहिती विकल्या गेल्यास भारतातील 13 लाख कार्डधारकांवर आर्थिक फसवणुकीचे संकट कोसळणार आहे. आर्थिक माहितीच्या चोरीचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठ प्रकार मानला जात आहे.
सिंगापूरची सुरक्षा संस्था ‘ग्रुप-आयबी’ने हा प्रकार जगासमोर आणला आहे. त्यानुसार यातील 18 टक्के कार्डची माहिती एकाच बँकेच्या कार्डची आहे. शिवाय इतर काही बँकांच्या कार्डांची माहितीची चोरी झाली असून, एकूण कार्डांपैकी 98 टक्के कार्ड भारतीय बँकांचे आहेत. 1 टक्का कार्ड कोलंबियातील असल्याचे समोर आले आहे.
कार्डांची माहिती अशा फसवणुकीसाठी कुख्यात असणाऱ्या जोकर्स स्टॅश नावाच्या वेबसाईटवर विकली जात आहे. त्यासाठी ‘इंडिया मिक्स न्यू 01’ असे नाव देण्यात आले आहे. ट्रॅक 1 आणि ट्रॅक 2 अशा दोन प्रकारचा डेटा यावर विकला जात आहे. प्रत्येक कार्डसाठी 100 डॉलर किंमत आकारण्यात येत आहे. ही माहिती विकणाऱ्या सायबर गुन्हेगार यातून १३ लाख कोटी डॉलर्सची माया कमावणार आहे.
कार्डधारकांना धोका काय?
ज्यांच्या कार्डची माहिती डार्क वेबवर विकली जाईल आणि त्या कार्डचा वापर त्या हॅकरने केला तर त्याचा आर्थिक भूर्दंड कार्डधारकांना बसेल.
यापूर्वीही असे झाले का?
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात याच जोकर्स स्टॅश नावाच्या वेबसाईटवर अमेरिकेतील 21.5 लाख कार्ड्सची माहिती विकण्यात येत होती.ऑगस्ट महिन्यातही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी 53 लाख कार्ड्सची माहिती चोरी करून विकण्यात येत होती.
माहिती चोरीला गेली कशी?
कार्डच्या माहितीची चोरी करण्यासाठी एटीएम सेंटरचा वापर केला जातो. तेथे हे हॅकर्स स्कीमर लावतात. ज्या ठिकाणी असे स्कीमर लावले असतील, त्या एटीएममधून कार्डधारकाने पैसे काढल्यास त्याचा कार्डची सर्व माहिती चोरांकडे पोहोचते. शिवाय पीओएस हे मशिन कोणत्याही दुकानात किंवा हॉटेलमध्ये पाहायला मिळते. त्यालाही स्कीमर नावाचे उपकरण लावून माहिती चोरली जाते. ही माहितीही अशाच प्रकारे चोरली गेल्याचा अंदाज आहे.