नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे पोलीस, डॉक्टर्स, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बँकिंग क्षेत्रही यापासून दूर राहिलेले नाही. आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे १३०० बँक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. इंडियन बँक असोसिएशनने अर्थमंत्रालयाला लिहिलेल्या पत्रातून ही माहिती उघड झाली आहे.
बँकिंग क्षेत्रात एकूण १३.५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ६०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोनाच्या पहिल्या लाटेत झाला, तर दुसऱ्या लाटेत मृत्यूचेही प्रमाण अधिक होते. या लाटेत केवळ दोन महिन्यांमध्येच आणखी ७०० जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण देशातील एकूण कोरोना बळींपैकी ०.०२ टक्के एवढे आहे.
लॉकडाऊनमध्ये कर्मचाऱ्यांची अडवणूक
राज्य सरकार, तसेच स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊन, तसेच कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून बँक कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची तक्रार बँकांनी केली आहे.