Join us

अदानींच्या 'या' कंपनीला १३१ कोटींचं नुकसान, तज्ज्ञांनी कमी केलं टार्गेट प्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 1:22 PM

सप्टेंबर तिमाहीच्या निराशाजनक निकालानंतर, अदानी समूहाच्या कंपनीच्या शेअर्सवर त्याचा परिणाम दिसून आला.

Adani Wilmar Share: सप्टेंबर तिमाहीच्या निराशाजनक निकालानंतर, अदानी समूहाच्या खाद्यतेल कंपनी अदानी विल्मारच्या शेअर्सवर त्याचा परिणाम दिसून आला. गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीचे शेअर किरकोळ घसरून 313.40 रुपयांवर आला. तर दुसरीकडे ब्रोकरेजनं या स्टॉकची टार्गेट प्राईजदेखील कमी केली आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं अदानी विल्मर लिमिटेडची टार्गेट प्राईज 600 रुपयांवरून 515 रुपयांपर्यंत कमी केली आहे. मात्र, ब्रोकरेजने या शेअरला 'बाय' रेटिंग दिलंय.अदानी विल्मरने बुधवारी सप्टेंबर तिमाहीत 131 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा नोंदवला. खाद्य तेल कंपनी अदानी विल्मारला चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या (जुलै-सप्टेंबर) तिमाहीत 130.73 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा सहन करावा लागला. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केल्यानं त्यांना हे नुकसान सोसावं लागलंय.गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 48.76 कोटी रुपये होता. अदानी विल्मरनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितलं की, जुलै-सप्टेंबर या कालावधीत त्यांचं एकूण उत्पन्नही 12,331.20 कोटी रुपयांवर घसरलं आहे, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 14,209.20 कोटी रुपये होते. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण खर्च 12,439.45 कोटी रुपये होता, जो मागील वर्षी याच कालावधीत 14,149.62 कोटी रुपये होता.ब्रोकरेज फर्मचं म्हणणं काय?नुवामानं ही कामगिरी त्यांच्या अंदाजापेक्षा कमी असल्याचं म्हटलंय. खाद्यतेलाचं  प्रमाण वर्ष दर वर्षनुसार 4 टक्क्यांनी वाढलं आहे, तर सफोला खाद्यतेलाचं प्रमाण 19 टक्क्यांनी घटलं आहे. तर याच तिमाहीत सफोला खाद्यतेलाचं प्रमाण कमी आकड्यांमध्ये वाढले असून किमतीत 12 टक्क्यांनी घट झाली असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अदानीशेअर बाजारगौतम अदानी