Join us  

भारत-यूएईमध्ये १४ करार

By admin | Published: January 26, 2017 1:23 AM

भारत आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांनी संरक्षण, सुरक्षा, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात १४ करारांवर बुधवारी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

नवी दिल्ली : भारत आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांनी संरक्षण, सुरक्षा, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात १४ करारांवर बुधवारी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या दोन्ही देशांनी परस्पर सामंजस्य वाढविण्याचा निर्धार केला.अबुधाबीचे युवराज शेख मोहंमद बिन झायेद अल नाहयान यांचे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी मंगळवारी भारतात आगमन झाले. यंदाच्या सोहळ्याचे ते प्रमुख पाहुणे आहेत. अल नाहयान यांच्या सोबत यूएईचे अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचेही आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अल नाहयान यांनी एक बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानंतर यूएई नेत्यांसोबत पंतप्रधान मोदी यांनी नंतर संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, दोन्ही देशांतील चर्चा फलदायी ठरली आहे. द्विपक्षीय संबंधांच्या सर्व क्षेत्रांतील मुद्यांवर व्यापक विचार-विनिमय करण्यात आला. सर्वंकष धोरणात्मक भागीदारी हेतुपूर्ण आणि कृतिप्रवण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आराखडा आम्ही तयार केला आहे. संरक्षण क्षेत्रातील सहकार्याने द्विपक्षीय कराराला नवा पैलू दिला आहे. हे करार केवळ दोन्ही देशांसाठीच महत्त्वाचे नसून संपूर्ण परिसरासाठी उपयुक्त आहेत. दोन्ही देशांतील संबंधांमुळे दोन्ही देशांचा भोवताल स्थिर होईल. आर्थिक भागीदारीमुळे विभागीय व जागतिक भरभराट निर्माण करण्यास कारणीभूत ठरेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)