केंद्र सरकारने महागाईच्या काळात जीएसटीद्वारे बक्कळ कमाई केली होती. एप्रिलमध्ये सर्वाधिक जीएसटी गोळा झाला होता. परंतू मे मध्ये केंद्र सरकारच्या कमाईला झटका बसला आहे. बुधवारी अर्थमंत्रालयाने मे मधील जीएसटी संकलनाचे आकडे जारी केले.
मे महिन्यात 1.41 लाख कोटी रुपये एवढा जीएसटी गोळा झाला. गेल्या वर्षी याच महिन्यापेक्षा यंदाचा जीएसटी हा ४४ टक्के जास्त आहे. तर गेल्या महिन्यात, एप्रिलपेक्षा १६.६ टक्के कमी आहे. एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाच्या आकड्याने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. यामुळे मे मध्ये देखील विक्रमी संकलन होईल अशी अपेक्षा सरकारला होती.
एप्रिलमध्ये 1.68 लाख कोटी एवढा प्रचंड जीएसटी गोळा झाला होता. तर मार्चमध्ये 1.42 लाख कोटी, फेब्रुवारीमध्ये 1.33 लाख कोटी रुपये संकलन झाले होते. आजवर चार महिने जीएसटी संकलन १.४० लाखांपेक्षा अधिक राहिले आहे.
अर्थ मंत्रालयानुसार मे २०२२ मध्ये जीएसटी संकलन हे 1,40,885 कोटी रुपये एवढे झालेआहे. यामध्ये सीजीएसटी 25,036 कोटी रुपये, एसजीएसटी 32,001 कोटी रुपये, आयजीएसटी 73,345 कोटी रुपये (आयातीवरील 37,469 कोटी रुपये) आणि उपकर 10,502 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये 97,821 कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते.