Join us  

देशभरात १४१ कोटींचा नव्या नोटांतील काळा पैसा जप्त!

By admin | Published: April 07, 2017 11:49 PM

प्राप्तिकर विभाग, सक्तवसुली संचालनालय आणि इतर करविषयक संस्थांनी मिळून देशातील विविध भागांतून २००० आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभाग, सक्तवसुली संचालनालय आणि इतर करविषयक संस्थांनी मिळून देशातील विविध भागांतून २००० आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या असून, याचे मूल्य १४१.१३ कोटी रुपये आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. हा सारा काळा पैसा असून, त्यातील काही रक्कम राष्ट्रायीकृत बँकांमार्फत पुन्हा चलनात आणण्यात आली आहे. अरुण जेटली यांनी सांगितले की, यातील ११० कोटी रुपये प्राप्तिकर विभागाने जप्त केले. आतापर्यंत सक्तवसुली संचालनालयाने ४ कोटी ५४ लाख, सीबीआयने २६ कोटी २१ लाख आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने ३८ लाख रुपये जप्त केले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने जप्त केलेल्या २००० आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटास्टेट बँकेमध्ये किंवा अन्य राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नोटा चलनात परत येतील. काळ्या पैशांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सरकारच्या अनेक एजन्सी काम करत आहेत. सक्तवसुली संचालनालय, सीबीआय, आयटी विभाग, महसूल गुप्तचर विभाग यांचे अधिकारी विविध ठिकाणी कार्यरत असून काळ्या पैशांविरुद्ध कारवाई करत आहेत. >१८ लाख खाते उत्पन्नाशी विसंगत नोटाबंदीनंतर अशा १८ लाख खात्यांचा तपास लागला आहे जे की खातेदारांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांशी विसंगत आहेत, अशी माहितीही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली. जप्त केलेली काही रक्कम राष्ट्रायीकृत बँकांमार्फत पुन्हा चलनात आणण्यात आली आहे.ज्या खातेदारांनी याबाबत विवरण दिले नाही त्यांना नोटीस जारी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, डिजिटल प्रक्रिया वाढली तशी यातील जोखीमही वाढली आहे. पण, या प्रणालीला अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी तज्ज्ञांची एक टीम काम करत आहे. जेणेकरून ही सुरक्षा भेदली जाऊ नये. तथापि, ३१ मार्च २०१६ पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील आणि ग्रामीण बँकातील २९ टक्के बचत खाती निष्क्रिय होती, असेही त्यांनी सांगितले.