लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २०२३ मध्ये भारतातील जाहिरातींवर होणारा खर्च १५.५ टक्क्यांनी वाढून १.४६ लाख रुपयांवर जाण्याची शक्यता माध्यम संस्था ‘ग्रुप एम’ने दिली आहे. ‘ग्रुप एम’ने जारी केलेल्या अंदाजात म्हटले की, २०२२ मध्ये आदल्या वर्षाच्या तुलनेत जाहिरात खर्च १५.७ टक्क्यांनी वाढला होता. जाहिरातींच्या बाबतीत भारत सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या टॉप-१० बाजारांत समाविष्ट होईल. तेच यंदा खर्चाच्या बाबतीत भारत आठवा सर्वांत मोठा देश आहे.
पारंपरिक टीव्ही माध्यमांवरील जाहिरात खर्चाची हिस्सेदारी ३१ टक्क्यांवरून किंचित घसरून ३० टक्के होईल. मुद्रित माध्यमांतील जाहिरातींचा खर्च ११ टक्क्यांवरून घसरून १० टक्के होईल. मुद्रित माध्यमांतील जाहिरातींचा एकूण खर्च मात्र १३,५१९ कोटी रुपयांवरून वाढून १४,५२० कोटी रुपये होईल.