- अविनाश कोळी
सांगली : आंतरराष्ट्रीय स्तरावर घटलेले उत्पादन, महापूर व अतिवृष्टीमुळे देशांतर्गत पिकांचे झालेले नुकसान यामुळे मागील काही आठवड्यांपासून चढणारे सोयाबीनचे भाव अचानक खाली गेले आहेत. दरात १५ टक्के घट झाली असून, सोयाबीनच्या पशूखाद्य आयातीस परवानगी दिल्याचा हा परिणाम असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात वेगाने वाढ होत आहे. ६५ रुपये किलोवरुन १०० रुपयांपर्यंत भाव वाढल्याने अनेक सोया प्रक्रिया उद्योगांना याचा फटका बसला. यात सर्वाधिक फटका पोल्ट्री उद्योगाला बसला होता. सोया खाद्य महागल्याने त्यांच्या खर्चात यामुळे दुप्पट वाढ झाली होती. ऑल इंडिया पोल्ट्री ब्रिडर्स असोसिएशनने या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडे शून्य आयात शुल्कावर सोया पशुखाद्य आयातीस परवानगीची मागणी केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षाही भारतातील सोयाबीनचे भाव अधिक असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. त्यावरून गेले दीड महिना खल सुरू होता.
सोयाबीनवर चालणाऱ्या उद्योजकांनीही सोयाबीनच्या दरवाढीवर नाराजी व्यक्त करत केंद्र शासनाकडे दर नियंत्रणासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती. बुधवारी पशुपालन व डेअरी मंत्रालयाचे सहआयुक्त एस. के. दत्ता यांनी १४ लाख मेट्रिक टन सोया पशुखाद्य आयातीस परवानगी दिली.