संजय दत्तचा स्कॉच व्हिस्की ब्रँड द ग्लेनवॉकची (The Glenwalk) सध्या चर्चा आहे. डिसेंबरपासून सुमारे ४५ दिवसांत २०० मिलीच्या ३ लाखांहून अधिक बॉटल्सची विक्री झाली आहे. या विक्रीतून संजय दत्तनं ४५ दिवसांत सुमारे १५ कोटी रुपये कमावलेत. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, २०० मिलीच्या बॉटलची किंमत ५०० रुपये आहे. २०० मिलीची ही बॉटल डिसेंबरमध्ये लाँच करण्यात आली होती.
ग्लेनवॉकची सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात होते. येथील विक्रीचा वाटा ६८ टक्के आहे. इथं नव्या २०० मिली निप फॉरमॅटला खूप मागणी आहे. महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमध्ये उपस्थिती असलेल्या या ब्रँडनं येत्या दोन महिन्यांत आणखी विस्ताराची योजना आखलीये.
ग्लेनवॉकचा ब्रँड अॅम्बेसेडर संजय दत्त यांनंही याबद्दल आनंद व्यक्त केलाय. द ग्लेनवॉकची निर्मिती स्कॉटलंडमध्ये केली जाते. याचं पॅकिंगही स्कॉटलंडमध्येच होतं. भारतात याची विक्री कार्टेल ब्रदर्स (Cartel Bros) नावाची कंपनी करते. मोक्ष सानी या कंपनीच्या फाऊंडर मेंबर्सपैकी एक आहेत. संजय दत्तनं दोन वर्षांपूर्वी या व्यवसायाची सुरुवात केली. दोन वर्षांत या ब्रँडनं भारतासह दुबईमध्येही आपला विस्तार केलाय. अन्य देशांमध्येही हा ब्रँड लाँच करण्याची कंपनीची योजना आहे.