Join us

१५ लाख ग्राहकांनी दाखल केले २३ हजार कोटींचे आरोग्य विमा दावे; कोरोना उपचारांमुळे मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 8:31 AM

११,७०० कोटींची रक्कम दिली, प्राप्त माहितीनुसार, १४ मेपर्यंत १४.८२ लाख आरोग्य विमाधारकांनी २२ हजार ९९५ कोटी रुपयांचे दावे दाखल केले आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे कोरोनाच्या उपचारासाठी करण्यात आलेले आरोग्य विम्याचे दावेदेखील मोठ्या संख्येने वाढले आहेत. तब्बल १४.८२ लाख लोकांनी सुमारे २३ हजार कोटी रुपयांचे दावे दाखल केले आहेत. त्यापैकी ११ हजार ७०० कोटींचे दावे मंजूर करण्यात आले आहेत. 

प्राप्त माहितीनुसार, १४ मेपर्यंत १४.८२ लाख आरोग्य विमाधारकांनी २२ हजार ९९५ कोटी रुपयांचे दावे दाखल केले आहेत. त्यापैकी १२.३३ लाख ग्राहकांचे ११ हजार ७९४ कोटी रुपयांचे दावे मंजूर करण्यात आले आहेत. सुमारे अडीच लाख ग्राहकांचे ११ हजार कोटी रुपयांचे दावे अद्याप प्रलंबित असल्याची माहिती सामान्य विमा परिषदेने दिली आहे. हे दावे एप्रिल २०२० पासून कोविड विशेष योजनेसह सर्व आरोग्य विमा योजनेंतर्गत केलेले आहेत. गेल्या वर्षभरात या योजनेत मोठ्या प्रमाणावर दावे दाखल होत आहे.

महाराष्ट्रातून सर्वाधिक दावेआरोग्य विम्याच्या दाव्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यातून ५.३५ लाख ग्राहकांनी ६८९६ कोटी रुपयांचे दावे दाखल केले आहेत. त्यानंतर गुजरात, कर्नाटक आणि दिल्लीचा समावेश आहे. या पाच राज्यांमधून सुमारे ६५ टक्के दावे दाखल झाले आहेत. काही विमा कंपन्यांनी कोरोना कवच आणि कोरोना रक्षक योजनांची विक्री थांबविली आहे किंवा त्यांचे नूतनीकरण करण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची ‘आयआरडीए’ने दखल घेतली असून, संबंधित कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. हे प्रकार कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना आढळून आले आहेत. खासगी कंपन्यांसह सरकारी कंपन्यांचाही यात समावेश आहे. संकटाच्या काळात पात्र ग्राहकांना पॉलिसी नाकारणे चुकीचे असल्याचे ‘आयआरडीए’ने म्हटले आहे.

टॅग्स :आरोग्य