लोकमत न्यूज नेटवर्क : मुंबई : वस्त्रोद्याेगापासून रिअल इस्टेटपर्यंत विविध क्षेत्रात दबदबा असलेली कंपनी रेमंडला कौटुंबिक कलहामुळे १३ नोव्हेंबरपासून १,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक मोठा फटका बसला आहे. कंपनीचे चेअरमन गौतम सिंघानिया आणि त्यांची संचालक पत्नी नवाज मोदी यांच्यातील वादानंतर सिंघानिया यांनी गेल्या आठवड्यात घटस्फोटाची घोषणा केली होती. रेमंडचे समभाग गेल्या दहा दिवसांत १३.४ टक्क्यांनी घसरून १,६४६ रुपयांवर आले तसेच कंपनीचे बाजार मूल्य १०,९७९ कोटी रुपयांवर आले. सिंघानिया कुटुंबाची कंपनीत अर्धी हिस्सेदारी आहे. १३ नोव्हेंबर रोजी पती - पत्नी वेगळे होत असल्याची बातमी फुटल्यानंतर कुटुंबाच्या हिस्सेदारीचे मूल्य १२ टक्क्यांनी घटले आहे.
वाद कशाने?- नवाज मोदी यांनी कंपनीत कॉर्पोरेट प्रशासनाचा अभाव असल्याचा आरोप केला. ८ नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत निधीच्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित केला होता. आपल्याला संचालक पदावरून हाकलण्याचा प्रयत्न सिंघानिया यांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.- आठ सदस्यीय संचालक मंडळावर सिंघानिया, मोदी आणि समूहाचे अध्यक्ष एस. एल. पोखर्णा यांच्याशिवाय ५ स्वतंत्र संचालक आहेत. यावर गौतम सिंघानिया यांनी म्हटले की, ‘माझ्या दोन मुली आणि परिवार यांचे हित लक्षात घेऊन मी काहीही बोलणार नाही.’
पत्नी, मुलींना हवी ७५ टक्के भागीदारीकंपनीच्या कायदाविषयक सुत्रांनी सांगितले की, खासगी पातळीवर बसून वाद मिटविण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंकडून सुरू आहेत. लवकरच तोडगा निघेल. मोदी आणि त्यांच्या दोन मुलींनी कंपनीतील ७५ टक्के भागीदारी मागितली आहे. सिंघानिया यांना मात्र ट्रस्टसारखी रचना हवी आहे.
सप्टेंबर तिमाहीत सर्वोत्तम कामगिरीकौटुंबीक वाद असतानाही रेमंड कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीत सर्वोत्तम कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. रेमंड कंपनीचा महसूल ६ % वाढून २,३२१ कोटी रुपये इतका झाला.