मुंबई : मागील काही महिन्यांत १५ हजार कर्मचाऱ्यांनी अॅक्सिस बँकेला सोडचिठ्ठी दिली. यात मुख्यत्वे मध्यम व शाखा कर्मचा-यांचा समावेश आहे. व्यवस्थापनाच्या नव्या कठोर धोरणाशी जुळवून घेण्यात अडचणी येत असल्यामुळे या लोकांनी राजीनामे देणे पसंत केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी सांगितले की, काही वरिष्ठ पातळीवरील अधिका-यांनीही राजीनामे दिले असले, तरी त्यांची संख्या थोडी आहे. बँक सोडणारे बहुतांश लोक शाखा पातळीवर काम करणारे आहेत. मोठ्या प्रमाणात कर्मचारी कमी झाल्यामुळे शाखांच्या दैनंदिन कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. बँकेच्या वृद्धीलाही धक्का बसू शकतो. अॅक्सिस बँकेने म्हटले की, मागील काही महिन्यांपासून विक्रमी राजीनामे आले आहेत, हे खरे असले, तरी चालू वित्त वर्षात बँकेने २८ हजार नवे लोक भरलेही आहेत. शेवटच्या तिमाहीत आणखी ४ हजार लोकांची भरती केली जाणार आहे. चालू वित्त वर्षातील बँकेची शुद्ध नोकरभरती १२,८00 आहे. आगामी दोन वर्षांत ३0 हजार लोकांची भरती केली जाणार आहे. चालू वित्त वर्षातील नोकरी सोडणा-या कर्मचा-यांचे प्रमाण १९ टक्के आहे. बँकेकडे ७२ हजार कर्मचारी असून, मागील वर्षात ११,५00 लोकांनी बँकेला सोडचिठ्ठी दिली.
बँकेचे मुख्य कार्यकारी अमिताभ चौधरी यांनी बँकेच्या कार्यपद्धतीत संपूर्ण बदल केला आहे. चौधरी यांच्या आधीच्या प्रमुख शिखा शर्मा यांना दुसरा कार्यकाळ देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिल्यानंतर जोखीम पत्करायची नाही, असे धोरण बँकेने स्वीकारले आहे. आपल्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी चौधरी यांनी काही निवडक लोकांची निवड केली आहे.
>यंदा होणार मोठी नोकरभरती
अॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक राजेश दडिया यांनी सांगितले की, बँकेची वाढ वेगाने होत असून, यंदाची आमची नोकरभरतीही मोठी आहे. आमचे कर्मचारी हीच आमची सर्वांत मोठी संपत्ती आहे आणि हेच आमचे वेगळेपणही आहे.
१५ हजार कर्मचाऱ्यांचा अॅक्सिस बँकेला रामराम, नव्या कठोर धोरणांशी जुळवून घेण्यात अडचणी
मागील काही महिन्यांत १५ हजार कर्मचाऱ्यांनी अॅक्सिस बँकेला सोडचिठ्ठी दिली.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 03:22 AM2020-01-09T03:22:30+5:302020-01-09T03:24:02+5:30