नवी दिल्ली : मागील ५ वर्षांत दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (दिल्ली-एनसीआर) वास्तव संपदा (रिअल इस्टेट) मालमत्तांच्या किमती १५२ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत, असे एका अहवालात म्हटले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुग्राम, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद यांचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय माध्यम समूहाच्या अहवालानुसार, मालमत्तांच्या किमतींत नोएडामध्ये सर्वाधिक १५२ टक्के वाढ झाली आहे. १३९ टक्के वाढींसह गाझियाबाद दुसऱ्या, तर १२१ टक्के वाढीसह ग्रेटर नोएडा तिसऱ्या स्थानी आहे.
किमती का वाढत आहेत?
इन्फ्रास्ट्रक्चर विकास : नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट, द्वारका एक्स्प्रेस-वे, दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वे आणि रॅपिड रेल्वे यांसारखे प्रकल्प दिल्ली-एनसीआरमध्ये झाले आहेत. मेट्रोचा विस्तारही झाला आहे.
साथीचा परिणाम : कोविड-१९ साथीच्या काळात सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून रिअल इस्टेट क्षेत्र लोकप्रिय झाले.
मागणी-पुरवठा तफावत : जमिनीची कमतरता असतानाच कठोर नियमांमुळे या क्षेत्रात पुरवठा मर्यादित राहिला. त्यामुळे किमती वाढल्या.
प्रीमियम प्रॉपर्टीची मागणी : लोक मोठ्या, लग्झरी घरांना प्राधान्य देत असल्याने या क्षेत्रात तेजी आली आहे.