मुंबई : दुबई येथे सुरू असलेल्या ‘वर्ल्ड एक्स्पो’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. परिषदेत २५ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली असून १५,२६० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होणार आहे. या माध्यमातून दहा हजारांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असून, आर्थिक आणि औद्योगिक सहकार्यासाठी आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशन यांच्याशी भागीदारी करण्यात आली आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थित शनिवारी झालेल्या सामंजस्य करारात जपान, सिंगापूर, स्वीडन, कोरिया, जर्मनी, इटली व भारत या देशांच्या कंपन्यांनी वाहन व वाहन घटक, लॉजिस्टिक्स, प्राणवायू उत्पादन, ईव्ही, टेक्सटाईल, डेटा सेंटर, औषध निर्माण, जैवइंधन व तेल आणि वायू क्षेत्रात गुंतवणूक केली. याप्रसंगी अपर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, विकास आयुक्त (उद्योग) हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. आर. रंगा नाईक व महाव्यवस्थापक (पणन व जनसंपर्क) अभिजित घोरपडे उपस्थित होते.
- १ ऑक्टोबर ते ३१ मार्च २०२२ या कालावधीमध्ये दुबई (यूएई) येथे वर्ल्ड एक्स्पो या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनामध्ये १९० देश सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन १९ नोव्हेंबर रोजी सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.