लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : १,५२८ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा करून १६ बँकांना फसविल्याच्या आरोपावरून दिल्ली येथील ‘इंडियन टेक्नॉलॉजी’ नावाच्या एका खाजगी संस्थेविरुद्ध सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. या घोटाळ्यात बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली १६ बँकांच्या समूहास गंडा घालण्यात आला आहे. या कंपनीचे दिल्लीत कार्यालय असून, हिमाचल प्रदेशात औद्योगिक युनिट आहे. कंपनीसह कंपनीचे संचालक आणि काही इतर आरोपींवरही गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
या गुन्ह्यातील आरोपींत कंपनीचे प्रवर्तक व सीएमडी राकेश केआर शर्मा व संचालक विनय केआर शर्मा यांचा समावेश आहे. याशिवाय कंपनीच्या काही कॉर्पोरेट हमीदारांवरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यात कोलकात्यातील मे. गुरुपथ मर्चंडाइज लि. आणि थंडर ट्रेडर्स लि. यांचा समावेश आहे. काही अज्ञात सरकारी नोकरांसह इतरांचाही आरोपींत समावेश आहे.
फसवणूक झालेल्या बँकांत बँक ऑफ इंडियासह युनियन बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, पंजाब व सिंध बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, एचडीएफसी बँक, ओरिएंटल बँक ऑफ कामर्स, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, स्टेट बँक ऑफ पतियाळा, युको बँक, अलाहाबाद बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक व डीबीएस यांचा समावेश आहे.
कर्जाची रक्कम वळविली अन्यत्र
आरोपी कंपनी फेरस आणि नॉनफेरस धातूच्या उत्पादन क्षेत्रात काम करीत होती. २००८ ते २०१३ या काळात कंपनीने बँक समूहाकडून १,५२८.०५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हा निधी कंपनीने अन्यत्र वळविला. मार्च २०१४ मध्ये कंपनीचे कर्ज खाते एनपीएमध्ये गेले. फेब्रुवारी २०१६ मध्ये हा घोटाळा असल्याचे घोषित करण्यात आले.