बहुतांश लोकांकडे हल्ली तुम्हाला एटीएम कार्ड मिळेल. एटीएम कार्डाच्या माध्यमातून जेव्हापासून ट्रान्झॅक्शन्स होऊ लागलीयेत, तेव्हापासून बँकिंग प्रक्रिया जलद आणि सोपी झालीये. एटीएम कार्डाचा वापर केवळ कॅश काढण्यासाठीच नाही, तर ऑनलाइन ट्रान्झॅक्शन्ससाठीही केला जातो. तुमच्या फोनमध्ये असलेल्या नेट बँकिंग सेवेची सुरुवातही करण्यासाठी तुम्हाला एटीएम कार्डाची गरज भासते. कार्डामुळे तुम्हाला सतत खिशात कॅश ठेवून फिरण्याचीही गरज नाही. पूर्वी पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर लोकांच्या रांगा दिसायच्या. पण हल्ली तसं दृश्य दिसत नाही.
तुम्ही आर्थिक बाबींसाठी ज्या एटीएम कार्डाचा वापर करता, त्यावर १६ डिजिट क्रमांक असतो. परंतु तुमच्या एटीएम कार्डावर लिहिलेल्या त्या १६ डिजिट क्रमांकाचाही अर्थ असतो.
काय आहे अर्थ?या १६ डिजिट अंकांचा संबंध थेट तुमच्या खात्याशी आहे. हा नंतर तुमच्या कार्डाच्या व्हेरिफिकेशन, सिक्युरिटी आणि तुमच्या ओळखीसाठी गरजेचा आहे. पहिला अंक त्या इंडस्ट्रीशी निगडीत असतो, जे ते जारी करतात. यालाच इंडस्ट्री आयडेंटीफायर म्हणतात. हा नंबर निरनिराळ्या इंस्ट्रीसाठी निरनिराळा असू शकतो.
पुढील पाच नंबर्सना इश्यूर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणतात. याद्वारे ते कोणत्या कंपनीनं जारी केलंय याची माहिती मिळते. यानंतर सातव्या क्रमांकापासून १५ व्या क्रमांकाचा संबंध तुमच्या बँक अकाऊंटशी असतो. ते बँक अकाऊंट नंबर नसतात, परंतु त्याच्याशी लिंक असतात. एटीएम कार्डावर असलेला अखेरचा क्रमांक त्याची व्हॅलिडिटी सांगतो. यालाच चेकसम डिजिट या नावानंही ओळखले जाते.