भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा पुरवणारी कंपनी टीसीएसमध्ये (TCS) नोकरीसाठी लाचखोरी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं १६ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं असून कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या सहा वेंडर्सना ब्लॅक लिस्ट केलंय. टीसीएसला कर्मचारी पुरवणारे सहा वेंडर्स, त्यांचे मालक आणि सहयोगी कंपन्यांना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससोबत काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये नोकरीच्या बदल्यात लाच घेतल्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.
यानंतर याचा गंभीररित्या तपास करण्यात आला आणि शेअर बाजाराला यासंदर्भात माहिती देण्यात आली. या प्रकरणी १६ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं आहे आणि ६ कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या सहा कंपन्या टीसीएसच्या वेंडर्स होत्या आणि कंत्राटी पद्धतीनं कर्मचारी पुरवत होत्या, असं कंपनीनं शेअर बाजाराला सांगितलं.
या प्रकरणी आतापर्यंत १९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी १६ जणांना कामावरून कमी करण्यात आलंय. तर तीन कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या कामावरून काढण्यात आलंय, असं कंपनीनं शेअर बाजाराला सांगितलं.
करण्यात आले होते आरोप
रिपोर्टनुसार व्हिसलब्लोव्हरनं टीसीएसच्या प्रमुख अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात आरोप केले होते. यामध्ये कंपनीचे रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे ग्लोबल चीफ ईएस चक्रवर्ती गेल्या अनेक वर्षांपासून स्टाफिंग कंपन्यांकडून कमिशन घेत असल्याचं म्हटलं होतं. टीसीएसच्या अजित मेनन यांनी आरोपांच्या तपासाचं नेतृत्व केलं. त्यानंतर चक्रवर्ती यांना सुट्टीवर पाठवण्यात आलं होतं.
TCS Job Scam प्रकरणी १६ कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता; ६ वेंडर ब्लॅकलिस्ट, पाहा डिटेल्स
टीसीएसमध्ये (TCS) नोकरीसाठी लाचखोरी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:06 PM2023-10-16T12:06:03+5:302023-10-16T12:06:24+5:30