नवी दिल्ली : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात लीटरमागे १० रुपये व डिझेलवरील उत्पादन शुुल्कात लीटरमागे १३ रुपये एवढी विक्रमी वाढ केल्याने चालू वित्तीय वर्षांत केंद्र सरकारला केवळ या दोन वस्तूंमधून तब्बल १.६ लाख कोटी रुपयांचा जादा महसूल मिळेल.
मंगळवारी सायंकाळपासून ही वाढ लागूू करण्यात आली. गेले दोन महिने आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर गडगडले तरी त्याचा लाभ तेल कंपन्यांनी ग्राहकांना दिलेला नाही. आता उत्पादन शुल्कवाढीचा बोजा त्या स्वस्त तेलामुळे वाचलेल्या पैशातून समायोजित करण्यात येणार असल्याने ग्राहकांना या शुल्कवाढीची कोणतीही झळ बसणार नाही, असे तेल कंपन्या साळसूदपणे सांगत आहेत. पण प्रत्यक्षात स्वस्त तेलाचा लाभ ग्राहक किंवा कंपन्यांना न देता त्या निमित्ताने स्वत:ची तिजोरी भरून घेण्याची मखलाशी सरकारने केली आहे.
याआधी सरकारने १४ मार्च रोजी पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क लीटरमागे प्रत्येकी तीन रुपयांनी वाढविले होते. त्यामुळे ३६ हजार कोटी रुपये जादा महसुलाची सोय झाली होती. ‘लॉकडाउन’मुळे इंधनाची मागणी गेल्या दीड महिन्यात कमी झाली असली तरी या दोन्ही वेळच्या शुल्कवाढीने वर्षअखेरपर्यंत सरकारला किमान दोन लाख कोटी रुपये जादा महसूल मिळेल, असा अंदाज आहे.
आताच्या या शुल्कवाढीने पेट्रोल व डिझेल या दोन्हींच्या किरकोळ विक्रीच्या प्रतिलीटर किमतीमध्ये ७० टक्के वाटा उत्पादन शुल्काचा असणार आहे. म्हणजे या इंधनासाठी तुम्ही देत असलेल्या प्रत्येक रुपयातील ७० पैसे केंद्र सरकारच्या तिजोरीत जाणार आहेत.
पंजाबात पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी महागले
पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात वाढ केली आहे. त्यामुळे ही दोन्ही इंधने प्रत्येकी दोन रुपयांनी महाग झाली आहेत. राज्य सरकारने मंगळवारी रात्री जारी केलेल्या आदेशानुसार, डिझेलवरील व्हॅट ११.८0 टक्क्यांवरून १५.१५ टक्के, तर पेट्रोलवरील व्हॅट २१.११ टक्क्यांवरून २३.३0 टक्के करण्यात आला आहे.