गेल्या काही वर्षांपासून भारतीय तरुण स्टार्टअप क्षेत्रात मोठी प्रगती करत आहेत. नवनवीन कल्पनांमुळे आज भारतात अनेक स्टार्टअप उद्योग सुरू झाले आहेत. यात एका 16 वर्षीय मुलीने मोठा हातभार लावला आहे. प्रांजली अवस्थी नावाच्या 16 वर्षीय मुलीने Delv.AI नावाचा AI स्टार्टअप सुरू केला आहे. मियामी टेक वीक इव्हेंटमध्ये प्रांजलीने तिच्या स्टार्टअपद्वारे सर्वांनाच चकीत केले.
प्रांजलीने सांगितले की, तिने हा स्टार्टअप जानेवारी 2022 मध्ये सुरू केला आणि आतापर्यंत तिने यातून 3.7 कोटी रुपयांचा निधी गोळा केला आहे. Delv.AI मध्ये एकूण 10 लोक काम करतात. प्रांजली अवस्थी म्हणते की, Delv.AI चा उद्देश संशोधकांना चांगल्या कार्यक्षमतेसाठी मदत करणे आहे. प्रांजलीला लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आवड आहे. तिचे वडील एक इंजिनीअर असून, त्यांनीच प्रांजलीला शाळेत असताना संगणक विज्ञान शिकण्यास सुरु केले. तेव्हापासून तिला तंत्रज्ञानात आवड निर्माण झाली.
वयाच्या 7 व्या वर्षी कोडींगला सुरुवात
प्रांजलीने सांगितले की, वडिलांच्या मदतीने तिने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी कोडिंग करायला सुरुवात केली. या कोडिंगने तिच्या कंपनीचा मजबूत पाया म्हणून काम केले आणि यातूनच आज तिने हे यश संपादन केले आहे. प्रांजली 11 वर्षांची असताना तिचे संपूर्ण कुटुंब फ्लोरिडाला स्थलांतरित झाले. तिथे तिला कोडिंगशी संबंधित काम शिकण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळाल्या.
इंटर्नशिप दरम्यान स्टार्टअप फाउंडेशन
प्रांजलीने वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी रिसर्च लॅबमध्ये इंटर्नशिप केली. इथूनच तिनी स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. इंटर्नशिप दरम्यान प्रांजलीला मशीन लर्निंग प्रकल्पांबद्दल माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. प्रांजलीने कोरोना संसर्गाच्या काळात ऑनलाइन क्लासेस घेतले आणि हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. यावेळी तिला मशीन लर्निंग प्रोजेक्ट्स चांगल्या प्रकारे समजले. यानंतर तिने स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला.