अदानी समूहाच्या (Adani Group) दोन कंपन्यांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. टॉप ग्लोबल इक्विटी फर्म बेन कॅपिटलनं (Bain Capital) अदानी समूहाच्या अदानी कॅपिटल आणि अदानी हाउसिंग या कंपन्यांचे अधिग्रहण केलं आहे. या अधिग्रहणाबबात दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला आहे. या करारांतर्गत अदानी कॅपिटल आणि अदानी हाऊसिंगमधील ९० टक्के भागभांडवल बेन कॅपिटलकडे असेल. उर्वरित १० टक्के भागीदारी मॅनेजमेंकडे असेल तर गौतम गुप्ता कंपनीचे एमडी आणि सीईओ म्हणून कायम राहणार आहेत.
कितीला झाली डील?
या करारानंतर अदानीच्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीची भागीदारी बेन कॅपिटलकडे गेली आहे. अमेरिकन फर्मनं हा हिस्सा १४४० कोटी रुपयांना विकत घेतलाय. तर दुसरीकडे अदानी फायनान्शियल सर्व्हिसेसचं एकूण मूल्यांकन १६०० कोटी रुपये आहे. बेन कॅपिटलसारखे गुंतवणूकदार कंपनीशी जोडले गेल्यानं आपल्याला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया या डीलनंतर गौतम अदानी यांनी दिली. तर अदानी कॅपिटलच्या क्षमतेवर आपल्याला विश्वास असल्याची प्रतिक्रिया बेन कॅपिटलकडून देण्यात आली.
भागीदारीनंतर गुंतवणूक
विशेष म्हणजे, २०१७ मध्ये, अदानी समूहानं आपला शॅडो बँकिंग व्यवसाय सुरू केला. परंतु आता अदानी कुटुंब या कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकत आहे. बेन कॅपिटलनं अदानी कुटुंबाचा १०० टक्के हिस्सा विकत घेतला आहे. तर गौरव गुप्ता आपली भादीदारी कायम ठेवणार आहेत. ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कायम राहतील. अदानी समूहाच्या या दोन कंपन्यांमधील भागभांडवल खरेदी केल्यानंतर बेन कॅपिटल या कंपनीमध्ये अतिरिक्त १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
कंपनीला आर्थिक बळकटी देण्यासाठी बेन कॅपिटल नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर म्हणून कंपनीला ५ कोटी डॉलर्सची लिक्विडिटी लाईनही उपलब्ध करून देईल. दरम्यान, हिंडेनबर्ग रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाला मोठा फटका बसला होता. अदानी समूहाकडून रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन करण्यात आलं होतं. यानंतर कंपनी निरनिराळ्या पद्धतीनं फंड जमा करण्याचं काम करत आहे. शिवाय रिपोर्टनंतर कंपनी सातत्यानं समूहावरील कर्ज कमी करण्याचे प्रयत्न करत आहे.