मुंबई : आशियाई विकास बॅंकेने भारताच्या जीडीपी विकासदराचा वाढविलेला अंदाज तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीच्या दिलेल्या संकेतानंतर भारतीय शेअर बाजारात माेठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ८०० अंकांपेक्षा जास्त वधारून नवा उच्चांक गाठला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही माेठी झेप घेत उच्चांकी पातळी गाठली. शेअर बाजारातील तेजीमुळे डिसेंबर महिन्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १७ लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त भर पडली आहे.
सेन्सेक्सने दाेन दिवसांपूर्वी ७० हजारा अंकांची पातळी गाठली हाेती. मात्र, त्या पातळीवर बंद झाला नव्हता. गुरुवारी सेन्सेक्स प्रथमच ७० हजारांच्या वर बंद झाला. गेल्या आठवड्यात आरबीआयने सलग तिसऱ्यांदा व्याजदर स्थिर ठेवले. महागाईमध्ये वाढ झाल तरी चिंताजनक नाही आणि त्यात घट हाेण्याची अपेक्षा ठेवत आरबीआयने हा निर्णय घेतला हाेता. त्यापाठाेपाठ फेडरल रिझर्व्हनेही व्याजदर स्थिर ठेवले. महत्त्वाचे म्हणजे, नव्या वर्षात दरकपात करण्याचे संकेत दिल्यामुळे जगभरातील अनेक शेअर बाजारांमध्ये तेजी आली.
डिसेंबरमध्ये गुंतवणूकदारांची तिजाेरी भरली
शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या तिजाेरीत डिसेंबर महिन्यात तब्बल १५ लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त भर पडली आहे. १ डिसेंबरला मुंबई शेअर बाजारात नाेंदणी असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य ३४३ लाख काेटी रुपये हाेते. ते १४ डिसेंबरला ३६० लाख काेटींच्या वर गेले.
१ डिसेंबर ३४३ लाख काेटी रुपये
५ डिसेंबर ३५१ लाख काेटी रुपये
१३ डिसेंबर ३५६ लाख काेटी रुपये
१४ डिसेंबर ३६० लाख काेटी रुपये
३ हजार अंकांनी वधारला सेन्सेक्स
डिसेंबर महिन्यातील ९ सत्रांमध्ये सेन्सेक्स ३,१०० अंकांपेक्षा जास्त वधारला आहे. निफ्टीमध्येही सुमारे ९०० अंकांची तेजी आली. या सत्रांमध्ये सेन्सेक्सने ६७ हजार, ६८ हजार, ६९ हजार आणि ७० हजारांचे महत्त्वाचे टप्पे पार केले. निफ्टीनेही २१ हजारांचा टप्पा ओलांडला.