मुंबई : बँक ऑफ बडोदा प्रणित बँकांचे ९७५ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीने मंधाना उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम मंधाना यांची १७० कोटी रुपयांची मालमत्ता गुरुवारी जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, बंगळुरू येथील फ्लॅटस्, कार्यालयीन जागा तसेच बँक खात्यातील ५५ लाख रुपये, सोने व हिऱ्याचे ४१ लाख रुपये मूल्याचे दागिने, १३ कोटी रुपये मूल्याचे शेअर्स व विविध रोखे, ८४ लाख रुपयांच्या तीन आलिशान गाड्या व ७० लाख रुपयांच्या घड्याळांचा समावेश आहे.
यापूर्वी ३१ जुलै रोजी मंधाना यांची ६७ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. मंधाना यांनी बँकेतून घेतलेल्या कर्जाचा अपहार केल्याप्रकरणी सर्वप्रथम मुंबईत सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. मात्र, याप्रकरणी मनी लॉड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीनेदेखील सीबीआयच्या तक्रारीच्या आधारे या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. कर्जापोटी मिळालेल्या पैशांचा वापर ज्या कारणासाठी कर्ज घेतले, त्यासाठी न करता हे पैसे विविध बँक खात्यातून त्यांनी स्वतःच्या व कुटुंबीयांच्या वैयक्तिक लाभासाठी वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या पैशांतून त्यांनी अनेक वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले. ३१ जुलै रोजी ईडीने पुरुषोत्तम मंधाना यांच्या मुलालाही अटक केली होती.