मुंबई : ६,८00 कोटी रुपयांचे कर्ज थकविणाऱ्या एका हिरे व्यावसायिक कंपनीची १७२ कोटी रुपयांची संपत्ती सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार व्हिनस डायमंडस् अॅण्ड ज्वेलरी लिमिटेड या कंपनीची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय गुजरातमधील सुरत शहरात आहे. तथापि, कंपनीचे मुख्यालय मात्र मुंबईत आहे. व्हिनसवर ६,८00 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यापैकी ४,६८0 कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. हे थकीत कर्ज स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाचे आहे. व्हिनसची दुसरी सहयोगी कंपनी फॉरईव्हर प्रिसियस डायमंडस् अॅण्ड ज्वेलरी या कंपनीकडे पंजाब नॅशनल बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांचे २,१२१.८२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. व्हिनस ही हिरा व्यवसायात मोठी कंपनी होती. जतीन मेहता हे तिचे प्रवर्तक आहेत. मनी लाँड्रिंगमध्ये सहभाग असल्याचा कंपनीवर आरोप आहे.
कर्ज थकवणाऱ्या कंपनीची १७२ कोटींची संपत्ती जप्त
By admin | Published: June 01, 2016 3:42 AM