लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) ऑक्टोबर २०२३ मधील संकलन वार्षिक आधारावर १३ टक्के वाढून १.७२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. हा जीएसटी संकलनाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च मासिक आकडा आहे.
वित्त मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. ऑक्टोबर २०२२ मध्ये १.५२ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२३ मधील जीएसटी महसूल हा एप्रिल २०२३ मधील महसुलानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा आकडा ठरला आहे. एप्रिल २०२३ मध्ये १.८७ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते.
वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये सरासरी मासिक जीएसटी संकलन १.६६ लाख कोटी रुपये राहिले. मागील वर्षीच्या तुलनेत ते ११ टक्के अधिक आहे.