नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं मंगळवारी स्वयंचलितसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे जागतिक स्तरावर जवळपास 18 कोटी नोक-यांवर टांगती तलवार येऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जगभरातील नेत्यांना महिलांना कौशल्य प्रदान करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच महिलांवर होणा-या लैंगिक अत्याचाराला पायबंद घालून चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं स्पष्ट केलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँकेची दरवर्षीप्रमाणे यंदाही एक बैठक झाली. या बैठकीनंतर दोघांनी संयुक्तरीत्या पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे. 30 देशांतील आकड्यांचं विश्लेषण केल्यास मोठ्या प्रमाणात महिलांना नोक-यांना मुकावं लागणार आहे. तसेच या 30 देशांमध्ये आर्थिक सहकार आणि विकास संस्थेच्या माध्यमातून काम सुरू आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे महिलांची मागणी घटू शकते. तसेच महिलांना या स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे कमी पगारही मिळू शकतो.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माहितीनुसार, 30 देशांमधील 5.4 कोटी कामगारांपैकी 10 टक्के महिला आणि पुरुष कामगारांच्या नोक-यांना सर्वाधिक धोका आहे. ऑटोमेशनमुळे महिला कामगारांपैकी 11 टक्के महिलांच्या नोक-यांवर गंडांतर येऊ शकते. तर पुरुषांचं प्रमाण हे 9 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे या देशातील 2.6 टक्के महिलांना नोकरी जाण्याची भीती आहे. कमी शिकलेल्या आणि चाळिशी ओलांडलेल्या महिलांची या ऑटोमेशनमधून नोकरी जाऊ शकते.
नव्या तंत्रज्ञानामुळे 18 कोटी महिलांच्या नोकरीवर टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 8:50 PM