Join us

१ सप्टेंबरपासून 'या' OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन महागणार; पाहा किती रुपये वाढली किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 11:03 PM

OTT Subscription : १ सप्टेंबरपासून वाढणार ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन. पाहा कोणतं आहे हे अॅप आणि किती वाढणार पैसे.

ठळक मुद्दे १ सप्टेंबरपासून वाढणार ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन. पाहा कोणतं आहे हे अॅप आणि किती वाढणार पैसे.

सप्टेंबर महिना येण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन घेणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर पुढील महिन्यापासून थोडा ताण वाढणार आहे. एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मनं आपल्या सबस्क्रिप्शनची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Disney+ Hotstar १ सप्टेंबरपासून आपल्या प्लॅन्सची किंमत वाढवणार आहे. कंपनीनं आता Disney+ Hotstar VIP चा ३९९ रूपयांचा प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Disney+ Hotstar नं आता नवे प्लॅन्स लाँच केले आहेत. आता ग्राहकांना कंपनी तीन प्लॅनपैकी एक निवडण्याचा पर्याय देणार आहे. या प्लॅन्सची किंमत ४९९ रूपये, ८९९ रूपये आणि १४९९ रूपये इतकी आहे. 

Disney+ Hotstar वर ग्राहकांना डिस्नेच्याही काही कंटेन्टचा आनंद घेता येतो. यामध्ये डिस्ने, मार्वल, स्टार वॉर्स आणि नॅशनल जिओग्राफीक, तसंच २० व्या जनरेशनच्या कंटेन्टचा समावेश आहे. याशिवाय यावर हॉटस्टार स्पेशल वेबसीरिज आणि Disney+ Hotstar मल्टीप्लेक्स चित्रपटही लाँच करण्यात आलं आहे. 

कोणते आहेत प्लॅन्स?Disney+ Hotstar चा मोबाईल प्लॅन तुम्हाला केवळ सिंगल डिव्हाईस स्ट्रिमिंगची परवानगी देणार आहे. याचा वापर आता केवळ मोबाईल वर करता येईल. Disney+ Hotstar वर उपलब्ध असलेला सर्व कंटेंन्ट यावर पाहायला मिळणार आहे. Disney+ Hotstar च्या मोबाईल सबस्क्रिप्शनसाठी आता ४९९ रूपये द्यावे लागणार आहेत. यापूर्वी Disney+ Hotstar VIP ची किंमत ३९९ रूपये होती. त्यामुळे सबस्क्रिप्शनची बेसलाईन किंमत वाढली आहे. 

कंपनीनं दुसऱ्या प्लॅनचं नाव 'सुपर' असं ठेवलं आहे. हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला दोन स्मार्टफोन्समध्ये Disney+ Hotstar चालवता येईल. यामध्ये ग्राहकांना केवळ HD क्वालिटी कंटेन्ट मिळणार आहे. त्यांना 4k क्वालिटीमध्ये कंटेन्ट पाहता येणार नाही. यासाठी ग्राहकांना ८९९ रूपये वर्षाला द्यावे लागणार आहेत.

Disney+ Hotstar चा तिसरा प्लॅन १४९९ रूपयांचा आहे. यामध्ये हे अॅप चार जणांना वापरण्याची परवानगी असेल. यामध्ये ग्राहकांना 4k कंटेन्टही स्ट्रीम करता येणार आहे. याचं नाव कंपनीनं प्रिमिअम असं ठेवलं आहे.

टॅग्स :ऑनलाइनस्मार्टफोनवेबसीरिजभारत