नवी दिल्ली : जनधन योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील ५० कोटींहून अधिक नागरिक बँकिंग व्यवस्थेत आले आहेत. या खात्यामध्ये जमा असलेली रक्कम २ लाख कोटींहून अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी दिली. डिजिटल अर्थव्यवस्थेकडे जात असताना सामान्य नागरिकांना बँकिग व्यवस्थेत आणून या योजनेने क्रांती घडवून आणली आहे, असेही त्या म्हणाल्या. पंतप्रधान जनधन योजनेच्या (पीएमजेडीव्हाय) नवव्या वर्षपूर्तीनिमित्त अर्थमंत्र्यांनी ही माहिती दिली.
का सुरू केली योजना?
ही योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आली होती. कोणत्याही प्रकारचे बँक खाते नसलेली कुटुंबे कोणत्याही प्रकारची आर्थिक सुरक्षा तसेच त्यांच्यापर्यंत आर्थिक लाभ पोहोचवण्यात आला. बँकिंगच्या परिघाबाहेर असलेल्या महिलांना यात आणण्यात आले.
जनधन खात्याचे लाभ कोणते?
मिनिमम बॅलन्सची अट या खात्यासाठी लागू नाही.
रुपे डेबिट कार्ड मोफत वापरता येते. आतापर्यंत ३४ कोटी कार्ड दिले आहेत.
२ लाखांपर्यंतचा अपघाती विमा संरक्षण मिळते.
१० हजारांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते.
लाभधारक, बँका, विमा कंपन्या आणि सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच पंतप्रधान जनधन योजनेने देशातील वित्तीय समायोजन वाढविण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे.
- निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री
जनधन-आधार-मोबाइल जोडल्याने सरकारी लाभ नागरिकांपर्यंत सोपवणे शक्य झाले. या खात्यांमध्ये लाभाचे थेट हस्तांतरण करणे शक्य झाले. समाजातील वंचित घटकांना याचा चांगला उपयोग झाला.
- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री