Join us

देशात ५ पैकी २ कर्मचारी कंत्राटी; २,४९,९८७ एकूण कारखान्यांमध्ये १.३६ कोटी कामगार, ५४ लाख हंगामी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 9:55 AM

देशात २०२२ या आर्थिक वर्षात २,४९,९८७ कारखाने असून त्यात एकूण १.३६ कोटी कामगार कार्यरत आहेत.

नवी दिल्ली : देशात २०२२ या आर्थिक वर्षात २,४९,९८७ कारखाने असून त्यात एकूण १.३६ कोटी कामगार कार्यरत आहेत. एकूण कामगारांपैकी तब्बल ४०.२ टक्के म्हणजे ५४ लाख कामगार हंगामी किंवा कंत्राटी स्वरूपाचे आहेत. कारखान्यांकडून कायमस्वरूपी तत्त्वावर काम करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण वेतनात सातत्याने घट होत आहे, अशी माहिती उद्योगाच्या वार्षिक सर्वेक्षण (एएसआय) अहवालातून पुढे आली आहे. हा अहवाल नुकताच जारी करण्यात आला.

या अहवालानुसार कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची संख्या सध्या सर्वाधिक आहे. कोरोनापूर्व काळात एकूण कामगारांमध्ये कंत्राटी कामगारांचे प्रमाण ३८.४ टक्के इतके होते. गेली तीन वर्षे हे प्रमाण वाढताना दिसत आहे.   बिहार आणि तेलंगणा या राज्यांत हंगामी कामगारांचे प्रमाण सर्वाधिक आहे तर केरळ आणि केंद्र शासित प्रदेश असलेल्या दिल्लीमध्ये हे प्रमाण सर्वात कमी आहे.

महिलांचे प्रमाण १८.४२ टक्के

२०२२ मध्ये कारखान्यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांच्या प्रमाणात किरकोळ वाढ झाली आहे. या वर्षात महिलांचे प्रमाण १८.४२ टक्के इतके होते. २०२१ साली महिलांचे प्रमाण १८.१ टक्के इतके होते. २०२२ मध्ये कारखान्यांकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ६.२९ लाख कोटींचा खर्च करण्यात आला.

२१ पैकी १० राज्यांमध्ये हंगामी कामगाराचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक होते. गोवा आणि पूर्वोत्तरमधील राज्यांचा समावेश या सर्वेक्षणात करण्यात आला नव्हता.

कारखाने तसेच कंपन्यांमध्ये हंगामी कामगारांना कराराद्वारे घेतले जाते. विशिष्ट प्रकारच्या कामासाठी त्यांची भरती केली जाते. कायम कामगारांच्या तुलनेत त्यांना कमी सुविधा दिल्या जातात. सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ तितक्या प्रमाणात दिला जात नाही.