नवी दिल्ली : अलीकडील काही महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमतींत कपात झाल्यामुळे देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत २ ते ३ रुपयांची कपात करण्यास वाव आहे, असे मानक संस्था ‘इक्रा’ने गुरुवारी म्हटले.
‘इक्रा’चे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा समूह प्रमुख गिरीशकुमार कदम यांनी सांगितले की, १७ सप्टेंबरपर्यंत तेल वितरण कंपन्यांना पेट्रोलवर १५ तर, डिझेलवर १२ रुपये प्रतिलिटर नफा होत होता. कंपन्यांच्या नफ्यात मोठी सुधारणा झाली आहे.
कच्चे तेल का उतरले?
कमजोर जागतिक आर्थिक वृद्धीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची मागणी घसरली आहे.
तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय ‘ओपेक प्लस’ देशांनी २ महिने पुढे ढकलला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल उतरले आहे.
शेवटची दरकपात कधी?
१५ मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात २ रुपये कपात करण्यात आली होती. तेव्हापासून इंधन दरात कोणत्याही प्रकारे कपात झालेली नाही.