- नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मौल्यवान रत्ने आणि आभूषणांच्या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठे जेम्स अँड ज्वेलरी पार्क नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत आकार घेत आहे. २१.३ एकर क्षेत्रावर हे पार्क पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येत आहे. या पार्कच्या उभारणीसाठी अत्यावश्यक असलेल्या पर्यावरण विभागच्या ना हरकत दाखल्यासाठी इंडिया ज्वेलरी पार्कने २३ फेब्रुवारी रोजी पर्यावरण मंत्रालयाच्या समितीकडे अर्ज केला आहे.
या पार्कसाठीचा भूखंड ताब्यात घेण्यासाठीचा एमआयडीसीसोबतचा करार जानेवारी २०२२ मध्ये झाला होता. त्यानंतर आता वर्षभरानंतर इंडिया ज्वेलरी पार्क, या संघटनेने परिवेश समितीकडे पर्यावरण दाखला मागितला आहे.
या प्रकल्पामध्ये परिसरातील कामगारांसाठी कमी किमतीच्या निवासी सुविधा विकसित करून त्यांना प्रशिक्षण आणि उच्च कौशल्ये प्रदान करण्यात येणार आहेत. यामुळे कुशल कारागीर निर्माण होण्यास मदत होणार आहे.
असे असेल पार्क
१४ माळ्यांच्या ९ इमारती राहणार असून, त्या एकमेकांना जोडलेल्या असतील. या इमारती मोठ्या कारखान्यांसाठी असतील. या ठिकाणी २६७२ ते ५२७३ चौरस फुटांचे गाळे राहणार आहेत. अशा प्रकारे येथे २३ लाख चौरस फूट कार्पेट एरिया असेल, असे संघटनेने म्हटले आहे.
ही इमारत छोट्या कारखान्यांसाठी राहणार असून, ती
नऊ माळ्यांची असेल. येथे ४१३ ते ६२१ चौरस फुटांचे गाळे असतील. येथे तीन लाख चौरस फुटांवर जागा मिळेल, असे अपेक्षित धरण्यात आले आहे.
दरवर्षी ४० टन सोन्याची बचत
जानेवारी २०२२ मध्ये हा भूखंड ताब्यात घेतला, त्यावेळी जीजेईपीसीचे (जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल) उपाध्यक्ष विपुल शाह यांनी सांगितले होते की, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि पायाभूत सुविधांअभावी सोन्याच्या नुकसानीचे जे प्रमाण १० आहे, ते या पार्कच्या उभारणीनंतर ३ टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होणार आहे. सोन्याची धूळ ही अत्याधुनिक सक्शन आणि ड्रेनेज सिस्टीमद्वारे सहज मिळवता येणार आहे. यामुळे दरवर्षी ४० टन सोन्याची बचत होऊ शकते.
आभूषणे बनविणारी १००० युनिट
महापे एमआयडीसीतील इलेक्ट्राॅनिक झोनमधील भूखंड क्रमांक ईएल २३७ वर पहिल्या टप्प्यात २१.३ एकर भूखंडावर हे पार्क आकार घेणार आहे. त्या ठिकाणी २० हजार कोटींहून अधिक गुंतवणूक आणि सुमारे एक लाख लोकांना रोजगार निर्माण होईल, असे सांगण्यात येत आहे. जगातील अत्यंत आधुनिक मशिनरी युक्त असे हे पार्क राहणार असून, त्या ठिकाणी रत्ने आणि आभूषणे बनविणारी १००० युनिट पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहेत.